भोम ते जुने गोवा या राष्ट्रीय महामार्ग 748 वरील 7 कि.मी. अंतराच्या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी केंद्राने 1060.21 कोटी रु. मंजुर केले असल्याची माहिती काल केंद्रीय भूपृष्ठ व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. भोम, खोर्ली व एला येथील अरूंद रस्त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून ही समस्या लक्षात घेऊन या पट्ट्यात दोन उड्डाण पूल उभारण्यात येणार आहेत. त्यांची लांबी जवळपास 4.275 कि.मी. एवढी असेल. त्याशिवाय तेथे 7 मीटर एवढ्या रूंदीचा दोन्ही दिशांनी सर्व्हिस रोडही असेल. हा महामार्ग पूर्वी 4ए या नावाने ओळखला जायचा. तो कर्नाटकातील बेळगावच्या राष्ट्रीय महामार्ग 48 तसेच पणजीच्या दिशेने जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग-66 (135कि.मी.) असा जोडला जात असून त्याद्वारे तेलंगणा, आंध्रप्रदेश व कर्नाटक या राज्यातील वाहतूक गोव्याला जोडली जात आहे. याद्वारे पणजी-खांडेपार चौपदरीकरणाचे कामही पूर्ण होणार असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.