निर्मला सावंत यांची मागणी
म्हादई नदीचे पाणी वळवण्यासाठी कर्नाटक सरकारने गोवा सीमेवर कुणकुंबी येथे केलेल्या कामाचे हवाई सर्वेक्षण गोवा सरकारने करावे, अशी मागणी काल म्हादई बचाव अभियानाच्या निमंत्रक निर्मला सावंत यांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना येथे केली.
निमंत्रक निर्मला सावंत यांनी म्हादई बचाव अभियानातर्फे राज्य सरकारच्या म्हादई नदीचे संवर्धनासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांबाबत चिंता व्यक्त केली आहे. जलस्त्रोत खात्याचे प्रधान अभियंते प्रमोद बदामी यांना मुदतवाढ देण्याच्या गोवा सरकारच्या निर्णयावर म्हादई बचाव अभियानाने जोरदार टीका केली. जलस्त्रोत खात्यात गोव्याचे अनेक सक्षम अभियंते आहेत जे ही जबाबदारी सांभाळू शकतात, असे एमबीएच्या निर्मला सावंत यांनी सांगितले. गोवा सरकारची कायदेशीर टीम दिल्लीतील म्हादई प्रकरणांवर लक्ष ठेवून आहे आणि गोव्याच्या हिताचे रक्षण करण्याबाबत अजिबात गंभीर नाही, असा आरोपही निर्मला सावंत यांनी केला. यावेळी राजेंद्र केरकर व इतरांची उपस्थिती होती.