गॅस 50 रुपयांनी महागला
महसूल संकलन वाढवण्यासाठी आणि अर्थसंकल्पीय तूट नियंत्रित करण्यासाठी मोदी सरकारने देशातील पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ केली आहे. त्याचप्रमाणे गॅस सिलिंडरच्या दरातही 50 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे उज्ज्वला योजनेअंतर्गत मिळणारा सिलिंडर 550 रुपयांवर गेला आहे. तर बिगर उज्ज्वला योजनेतील सिलिंडर 803 वरून 853 रुपयांवर पोहोचला आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी याबाबत माहिती दिली.
सिलिंडर 50 रुपयांनी महाग
एलपीजी गॅस दरवाढ आणि पेट्रोल- डिझेलच्या वाढलेल्या किमती 8 एप्रिल मध्यरात्री 12 वाजल्यापासून लागू होणार आहेत. गॅस विक्रीत तेल कंपन्यांचे 43,000 कोटी रुपयांचे नुकसान भरून काढण्यासाठी ही वाढ करण्यात आल्याची माहिती आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार आज मंगळवार, 8 एप्रिलपासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात येत आहे. ही वाढ उज्ज्वला योजना आणि उज्ज्वला नसलेल्या सर्व ग्राहकांना लागू होईल.
गॅसच्या किमती वाढतच रहाणार
इंधनाचे दर हे सरकारच्या नियंत्रणात नाहीत. त्यामुळे गॅस दराचा दर 15 ते 30 दिवसांत आढावा घेतला जातो, असे केंद्रीय मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी सांगितले.
किरकोळ किमती वाढणार नाहीत
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने उत्पादन शुल्क दरात वाढ झाली तरी पीएसयू तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतीत कोणतीही वाढ होणार नाही, असे कळवले आहे. जागतिक तेलाच्या किमती घसरल्यामुळे डिसेंबर 2024 मध्ये सरकारने स्थानिक पातळीवर उत्पादित कच्च्या तेल आणि इंधन निर्यातीवरील अनपेक्षित नफा कर काढून टाकला होता.
पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात वाढ
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरत असताना देखील सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ केली आहे. पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 13 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर 10 रुपये गोळा केले जात आहे. केंद्र सरकारने सोमवारी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली. हे बदल मंगळवारपासून लागू होणार आहेत.