फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन तीन दिवसीय भारत भेटीवर आले असून, काल त्यांनी मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या दोन्ही वरिष्ठ नेत्यांमध्ये द्विपक्षीय बैठक झाली. या बैठकीत दोन्ही देशातील व्यापारवृद्धीवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांना संबोधित केले. यावेळी त्यांनी भारत आणि फ्रान्स यांच्यातील ‘विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारी’ची घोषणा केली. विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारी म्हणजे दोन्ही देश व्यापार किंवा शस्त्रास्त्र व्यापारापुरते मर्यादित राहणार नाहीत, तर सुरक्षा, तंत्रज्ञान, अवकाश, सागरी सुरक्षा आणि प्रमुख जागतिक मुद्द्यांवर एकत्र काम करतील, असे मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित केले. पत्रकार परिषदे दरम्यान पंतप्रधान मोदींनी मॅक्रॉन यांचे स्वागत करताना आनंद व्यक्त केला. त्यांनी फ्रान्सचे वर्णन युरोपचे प्रमुख प्रवेशद्वार म्हणून केले. 2026 हे वर्ष भारत-युरोप संबंधांमध्ये एक महत्त्वाचा टप्पा आहे. काही दिवसांपूर्वी युरोपियन युनियनने भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा आणि सर्वात महत्त्वाकांक्षी मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी केली. तसेच फ्रान्स हा भारताच्या सर्वात जुन्या धोरणात्मक भागीदारांपैकी एक असल्याचे त्यांनी नमूद केले.
दोन्ही नेत्यांनी संयुक्तपणे टाटा-एअरबस एच-125 हेलिकॉप्टर असेंब्ली लाईनचे ऑनलाईन उद्घाटन केले. याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारत आणि फ्रान्स भारतात माउंट एव्हरेस्टच्या उंचीवर उडण्यास सक्षम असलेले जगातील एकमेव हेलिकॉप्टर तयार करतील आणि ते जागतिक स्तरावर निर्यात केले जातील. भारत-फ्रान्स भागीदारीला कोणत्याही सीमा नाहीत. या दोन्ही देशातील भागीदारी खोल महासागरांपासून सर्वात उंच पर्वतांपर्यंत पसरलेली असेल. जग अनिश्चिततेच्या काळातून जात असताना, भारत-फ्रान्स भागीदारी जागतिक स्थिरतेसाठी एक शक्ती बनेल, असे ते म्हणाले.
इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मानले आभार
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आणि द्विपक्षीय संबंधांना उल्लेखनीय आणि अद्वितीय असे वर्णन केले. दोन्ही राष्ट्रांनी त्यांचे संबंध विश्वास, मोकळेपणा आणि महत्त्वाकांक्षेवर आधारित विशेष धोरणात्मक भागीदारीकडे नेण्याचा निर्णय घेतला आहे, असे मॅक्रॉन म्हणाले.