Home Featured मांडवीतील नव्या कॅसिनो जहाजाला वाढता विरोध

मांडवीतील नव्या कॅसिनो जहाजाला वाढता विरोध

0

जागरुक नागरिकांनी आयएमबीत घेतली सभा; फेर्दिन रिबेलो यांच्याकडून पाठिंबा जाहीर; स्वाक्षरी मोहीम सुरू

प्रस्तावित 112 मीटर लांबीच्या नवीन कॅसिनो जहाजाला मांडवी नदीत प्रवेश देऊ नये, तसेच सागरी पर्यावरणाचे संरक्षण करावे आणि नदीतील कॅसिनो हटविण्याची मागणी मिनेझिस ब्रांगाझा सभागृहात नागरिकांनी आयोजित एका जागृती सभेत काल करण्यात आली.
मांडवी नदीतील नवीन मोठ्या कॅसिनो जहाजाला विरोध वाढत आहे. नवीन कॅसिनो जहाजाच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली आहे. पणजीतील नागरिकांकडून नवीन कॅसिनो जहाजाला विरोध केला जात आहे. पणजीतील नागरिकांनी पणजी महानगरपालिका, बंदर कप्तान खाते यांना निवेदन देत या कॅसिनो जहाजाला मान्यता देऊ नये अशी मागणी केली. त्यानंतर नागरिकांनी पणजी महानगरपालिका कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते.
आता, मांडवी नदीतील नवीन कॅसिनो जहाजाला विरोधात ही जागृती सभा घेण्यात आली असून, नवीन कॅसिनो जहाजाच्या विरोधातील आंदोलनाच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली. निवृत्त मुख्य न्यायाधीश फेर्दिन रिबेलो यांनी या जागृती सभेला उपस्थित राहून पाठिंबा
जाहीर केला.

फेर्दिन रिबेलो यांनी मांडवीतील नवीन कॅसिनो जहाजाच्या विरोधात असलेल्या नागरिकांना पाठिंबा जाहीर केला. मोठ्या कॅसिनो जहाजाच्या विरोधात नागरिकांनी घेतलेली भूमिका योग्य असल्याचे म्हटले. पर्यावरणीय आणि कायदेशीर अनुपालनाबद्दल रिबेलो यांनी चिंता व्यक्त केली. या प्रकल्पाचे परवाने आणि पर्यावरण मंजुरी उघड करण्याची मागणी त्यांनी केली.

नवीन कॅसिनो जहाजाच्या विरोधातील आंदोलन बिगरराजकीय असून, पणजी शहराचे संरक्षण करण्यासाठी हे आंदोलन केले जात आहे, असेही सभेत स्पष्ट करण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकर, सबिना मार्टिन्स व इतरांनी कॅसिनो संबंधीचे विविध मुद्दे मांडून मांडवी नदीतून कॅसिनो जहाजे हटविण्याची मागणी केली.

‘कॅसिनोंबाबत सरकारने
भूमिका स्पष्ट करावी’
मांडवी नदीतून कॅसिनो जहाजे अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्याचे धोरण तयार करण्यात आले होते. तथापि, मांडवी नदीत कॅसिनो जहाजांना मुदतवाढ दिली जात आहे. आता, कॅसिनो जहाजांची मुदत मार्च 2027 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे, अशी माहिती सभेत देण्यात आली. राज्य सरकारने मांडवी नदीतील कॅसिनो प्रश्नी आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी सभेत करण्यात आली.

सभेत कोणत्या मागण्या केल्या?
राज्यातील कॅसिनो कायमचे हद्दपार करण्यासाठी आराखडा तयार करावा, मांडवी किंवा अन्य कुठल्याही नदीत कॅसिनो जहाजाला मान्यता देऊ नये, मांडवी नदीतील गाळ उपसण्यांचे काम त्वरित बंद करावे, गोव्याला कौटुंबिक पर्यटनस्थळ म्हणून चालना द्यावी, कॅसिनोला पर्याय ठरणारे नवे महसूल मॉडेल विकसित करावे, अशा मागण्या नागरिकांनी कॅसिनो विरोधात आयोजित सभेत करण्यात आल्या.