सत्तरी तालुक्यात बिबट्यांच्या लोकवस्तीतील वावरामुळे वाढत चाललेल्या मानव-वन्यजीव संघर्षात एक पोलिसाचा नाहक बळी गेला आहे. चरावणे-सत्तरी परिसरातील यशवंत गोपाळ गावस (58) यांच्यावर शुक्रवारी बिबट्याने हल्ला करून त्यांना गंभीररित्या जखमी केले होते. बांबोळीतील गोमेकॉ इस्पितळात उपचारादरम्यान सोमवारी रात्री त्यांचे निधन झाले. गावस हे गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस मुख्यालयात वरिष्ठ तांत्रिक अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या निधनाने पोलीस खात्यासह चरावणे गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यशवंत गावस हे शुक्रवारी ठाणे येथून आपल्या मूळगावी चरावणे येथे दुचाकीने येत होते. अचानक जंगलातून चरावणेतील रस्त्यावर आलेल्या बिबट्याने झेप घेत त्यांच्यावर हल्ला केला. हल्ल्याबरोबर ते दुचाकीवरून रस्त्यावर खाली पडले व त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्यासह शरीरावर गंभीर जखमा झाल्या होत्या. तसेच दुचाकीचेही मोठे नुकसान
झाले होते.
प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये हलविण्यात आले होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्यावरील उपचारांची शर्थ केली; मात्र सोमवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.
शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
मंगळवारी दुपारी यशवंत गावस यांचे पार्थिव चरावणे येथील निवासस्थानी आणण्यात आले. ग्रामस्थ, नातेवाईक, पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर चरावणेतील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
लोकवस्तीत बिबट्यांचा
वाढता वावर
गेल्या काही वर्षांत सत्तरी तालुक्यात बिबट्यांचे लोकवस्तीत येण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. जंगलात खाद्याची कमतरता भासू लागल्याने ते कुत्रे, मांजरे व लहान जनावरांवर हल्ले करत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात आणि बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.