पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यातील द्विपक्षीय चर्चेनंतर दोन्ही देशांमधील संबंध आता एका नव्या उंचीवर पोहोचले आहेत. रोम येथे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदींनी भारत आणि इटलीने आपल्या संबंधांना ‘विशेष धोरणात्मक भागीदारी’ (स्पेशल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप) चा दर्जा दिल्याची घोषणा केली. गेल्या तीन वर्षांतील सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर हा मैलाचा दगड गाठण्यात दोन्ही देशांना यश आले आहे.
पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी भारत आणि इटली दरम्यानचा व्यापार आणखी मजबूत करण्यावर भर दिला. सध्या दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार 14 अब्ज युरो आहे, जो 2029 पर्यंत 22 अब्ज युरोवर नेण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवण्यात आले आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी भारत आणि युरोपीय संघ (ईयू) यांच्यातील प्रस्तावित ‘मुक्त व्यापार कराराचा’ (एफटीए) मोठा फायदा होईल, असा विश्वास मेलोनी यांनी व्यक्त केला. पंतप्रधान मोदींनीही या कराराला पाठिंबा दिल्याबद्दल इटलीचे आभार मानले आणि यामुळे दोन्ही देशांतील व्यावसायिक समुदायाला मोठा फायदा होईल, असे सांगितले.
तंत्रज्ञान आणि एआय ठरणार भागीदारीचे इंजिन
दोनों देशांमधील सहकार्याला गती देण्यासाठी तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत आणि इटलीमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय), क्वांटम तंत्रज्ञान, अंतराळ क्षेत्र आणि नागरी अणुऊर्जा क्षेत्रात सहकार्याची मोठी क्षमता आहे. दोन्ही देशांमधील स्टार्टअप्स, संशोधन संस्था आणि उद्योगांना एकत्र आणण्यासाठी ‘भारत-इटली इनोव्हेशन सेंटर’ स्थापन केले जाईल, अशी महत्त्वाची घोषणा यावेळी करण्यात आली.
दहशतवादाविरोधात एकत्र लढा
सुरक्षा आणि जागतिक शांततेच्या मुद्द्यावर बोलताना पंतप्रधान मोदींनी दहशतवादाचा कडक शब्दांत निषेध केला. भारत आणि इटली दहशतवादाविरोधात एकत्र उभे आहेत. दहशतवादाला होणाऱ्या आर्थिक पुरवठ्याविरोधातील आपल्या संयुक्त मोहिमेने जगासमोर एक आदर्श ठेवला आहे. जबाबदार लोकशाही देश केवळ दहशतवादाचा निषेध करत नाहीत, तर त्यांचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी ठोस पावले उचलतात, हा संदेश आम्ही दिला आहे, असे मोदींनी ठामपणे सांगितले.