अखिल भारतीय केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स असोसिएशनने काल पुकारलेल्या देशव्यापी संपाला काल गोव्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. या संपामुळे काल राज्यभरातील सुमारे 600 औषधालये (फार्मसी) बंद ठेवण्यात आल्याने रुग्णांची मोठी गैरसोय झाली. दरम्यान, राज्यातील सरकारी व खासगी इस्पितळांतील फार्मसी सोडून अन्य सर्व फार्मसी बंद ठेवून कडक संप पाळण्यात आल्याचे राज्यातील फार्मसी संघटनेने स्पष्ट केले.
या संपामुळे औषधे मिळू न शकल्याने राज्यातील रुग्ण, तसेच छोट्या-मोठ्या दुखण्यांसाठी औषधे घेणाऱ्यांची बरीच गैरसोय झाली. ज्या भागांत खासगी इस्पितळे व सरकारी इस्पितळे आहेत, तेथील रुग्णांनी व अन्यांनी तेथील औषधालयात जाऊन आपणाला पाहिजेत ती औषधे मिळवली. मात्र, ज्या भागांत अशी इस्पितळे नाहीत तेथील लोकांना ती मिळवण्यासाठी बरेच हाल सोसावे लागले.
ई-फार्मसीद्वारे देशभरात औषधांची जी बेकायदेशीर विक्री चालू आहे त्याचबरोबरच मोठमोठ्या कंपन्यांनी शहरी भागांत आपल्या फार्मसींचे जाळे विणून सवलतीच्या दरात औषधे देण्याची प्रकार सुरू केल्याने फार्मसी व्यावसायिकांचे जे नुकसान होऊ लागले आहे, त्याविरुद्ध तसेच तात्काळ ऑनलाईन औषध वितरण, तसेच ज्या औषधांचे व्यसन जडू शकते अशा औषधांचे अनिर्बंधपणे वितरण अशा विविध गोष्टींविरुद्ध आवाज उठवण्यासाठी अखिल भारतीय केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स असोसिएशनने काल या संपाची हाक दिली होती.
या संपामुळे फार्मसी बंद राहणार असल्याची ज्या लोकांना कल्पना होती त्यापैकी बऱ्याच लोकांनी मंगळवारीच आपणाला हवी ती औषधे खरेदी करण्यासाठी औषधालयांत गर्दी केली होती. मात्र, तसे असले तरी काल फार्मसी बंद राहिल्याने राज्यातील रुग्णांची मोठी गैरसोय झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.