भारतीय फलंदाजांच्या विश्‍वचषकातील अजोड खेळी

0
130
  •  सुधाकर रामचंद्र नाईक

भारतीय संघाचे विश्‍वचषकातील यश बव्हंशी काही अग्रणी खेळाडूंच्या अजोड, अलौकिक कामगिरीवर अवलंबून आहे. भारतीय क्रिकेटला नेहमीच दर्जेदार, महान फलंदाजांनी तारले.

आयसीसी विश्वचषक ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोच्च प्रतिष्ठेची प्रतियोगिता! भारतीय क्रिकेट संघाने दोन वेळा या प्रतिष्ठेच्या चषकावर नाव कोरले आहे. बलाढ्य ऑस्ट्रेलियाने (१९८७, १९९९, २००३, २००७, २०१५) सर्वाधिक पाच वेळा ही प्रतिष्ठेची प्रतियोगिता जिंकली आहे. त्यापाठोपाठ भारत (१९८३, २०११) आणि वेस्ट इंडीज (१९७५, १९७९) यांनी प्रत्येकी दोन वेळा ही स्पर्धा जिंकली. पाकिस्तान (१९९२), श्रीलंका (१९९६) आणि विद्यमान विजेता इंग्लंड (२०१९) यांनी प्रत्येकी एकेकदा जेतेपद मिळविले आहे.

गतवर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्‍वचषकात भारताकडे संभाव्य विजेता म्हणून पाहिले जात होते. पण उपांत्य फेरीत न्यूझिलंडकडून पत्कराव्या लागलेल्या अनपेक्षित पराभवामुळे भारताचे तिसर्‍यांदा विश्‍वचषकावर नाव कोरण्याचे स्वप्न अधुरे राहिले. भारतीय संघाचे विश्‍वचषकातील यश बव्हंशी काही अग्रणी खेळाडूंच्या अजोड, अलौकिक कामगिरीवर अवलंबून आहे. भारतीय क्रिकेटला नेहमीच दर्जेदार, महान फलंदाजांनी तारले. विश्‍वचषकात काही भारतीय फलंदाजांनी आपल्या अमोघ, अजोड कामगिरीने आपला ठसा उमटविला आहे. गत विश्‍वचषकाचा आढावा घेतल्यास धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्माच्या सदाबहार फलंदाजीवर भारताने उपांत्य फेरीपर्यंत लिलया धडक दिली. रोहितने या प्रतियोगितेत ९ सामन्यांत सर्वाधिक पाच शतके आणि एका अर्धशतकासह ६४८ धावा नोंदल्या. एका विश्‍वचषकात पाच शतकांचा भीमपराक्रम नोंेदणारा तो पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ठरला. ज्येष्ठ-श्रेष्ठ भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकरचा एका प्रतियोगितेत ६७५ धावांचा विक्रम मात्र त्याला मोडता आला नाही. मास्टर ब्लास्टरने विश्‍वचषक प्रतियोगितात सर्वाधिक २२७८ धावा नोंदल्या आहेत. रोहितने या प्रतियोगितेत द. आफ्रिका (नाबाद १२२), पाकिस्तान (१४०), इंग्लंड (१०२), बांगलादेश (१०४) आणि श्रीलंका (१०३) यांच्याविरुध्द शतके झळकविली. न्यूझिलंडविरुध्द उपांत्य फेरीत मात्र तो स्वस्तात बाद झाला आणि पर्यायाने भारतीय संघाचे स्पर्धेंतील आव्हान संपुष्टात आले.
रोहित शर्माच्या या कामगिरीव्यतिरिक्त भारताच्या अन्य काही अव्वल खेळाडूंच्या आयसीसी विश्‍वचषकातील यशस्वी फलंदाजीचा आढावा घेणे सयुक्तिक ठरावे.

१. कपिल देव : १९८३ मधील भारताच्या विश्‍वचषक अजिंक्यपदाचा शिल्पकार कपिल देवची झिम्बाब्वेविरुध्दची १७५ धावांची खेळी भारताची आजवरची अव्वल ठरावी. झिम्बाब्वेविरुध्दच्या त्या ‘मस्ट वीन’ सामन्यात भारतीय डावाची सुरुवात अत्यंत दयनीय झाली होती. केवळ ९ धावसंख्येवर आघाडीतील चार महारथी तंबूत परतले होते. कर्णधार कपिल देव मैदानावर उतरला, पण लगेच आणखी एक फलंदाज बाद झाला आणि ५ बाद १७ अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली, पण अष्टपैलू कपिलने वीरोचित मर्दुमकीत आक्रमक अवतार धारण करीत प्रतिस्पर्धी गोलंदाजीवर बेदरकार प्रहार करीत भारताला ८ बाद १४० वर नेले आणि अखेर यष्टिरक्षक सईद किरमाणीने त्याला सुरेख साथ दिली. उभयतांनी नाबाद १२६ धावांची भागी नोंदवीत भारताला सनसनाटी विजय मिळवून दिला. ‘कपिल डेव्हिल्स’नी नंतर मागे वळून न पाहता वीरोचित मर्दुमकीत प्रथमच विश्‍वचषक जिंकण्याचा भीमपराक्रम नोंदला.

२. महेंद्रसिंह धोनी : मुंबईत झालेल्या २०११ मधील विश्‍वचषकात श्रीलंकाविरुध्द अंतिम मुकाबल्यात वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर हे दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद झाले. गौतम गंभीर आणि वीराट कोहलीने सावध खेळीत डाव सावरला, पण वीराट बाद झाल्यावर बहरातील अष्टपैलू युवराज सिंहला उतरण्याऐवजी ‘कॅप्टन कूल’ धोनीने स्वत: मैदानावर उतरण्याचा कल्पक निर्णय घेतला आणि श्रीलंकेचा जादुई फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन्‌ची गोलंदाजी सावधपणे खेळत डावास आकार दिला. धोनीने कल्पकतेबरोबरच प्रसंगोचित आक्रमक खेळीत एक बाजू लावून धरतानाच ८ चौकार आणि २ षट्‌कारांसह नाबाद ९१ धावा ठोकीत भारताला ३८ वर्षांनंतर दुसर्‍यांदा विश्‍वचषक अजिंक्यपद मिळवून दिले.

३. सचिन तेंडुलकर : भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक आशियाई प्रतिस्पर्ध्यांमधील क्रिकेट मुकाबले नेहमीच तणावपूर्ण तथा उत्कंठावर्धक ठरतात आणि उभय संघांवरही कमालीचे दडपण असते. २००३ मधील विश्‍वचषकातील भारत-पाक लढतही अशी उत्कंठावर्धक ठरली. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करून भारताला २७४ धावांचे तगडे आव्हान दिले. वासिम अक्रम, वकार युनिस, शोएब अख्तर असे तीन भन्नाट वेग असलेले जागतिक दर्जाचे गोलंदाज पाकिस्तानी संघात असल्याने भारतापुढील आव्हान खरोखरच अवघड होते. भारताला हा मुकाबला जिंकायचा असल्यास मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची बॅट तळपायला हवी अशी प्रत्येक क्रिकेटरसिकाची अपेक्षा होती आणि लिटल मास्टरने आपल्यावरील विश्‍वास पूर्णतया सार्थ ठरविताना पाक गोलंदाजी आत्मविश्‍वास तथा आक्रमकपणे खेळत ७५ चेंडूत ९८ धावा चोपल्या. सचिनचे शतक केवळ २ धावांनी हुकले पण त्याने आपल्यावरील जबाबदारी समर्थपणे पेलत भारताचा विजय सुकर बनविला आणि अखेर राहुल द्रविड तथा युवराज सिंहने भारताचा सनसनाटी विजय झळकविला.
४. गौतम गंभीर : टीम इंडियाचा हा माजी सलामीवीर सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग या सलामीवीर जोडीच्या बहराच्या कालखंडात तिसर्‍या क्रमावर फलंदाजीस उतरायचा. २०११ मधील श्रीलंकेविरुध्दच्या विश्‍वचषक अंतिम मुकाबल्यात भारताचे दोन्ही दिग्गज सलामीवीर स्वस्तात बाद झाले. डाव सावरण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी तिसर्‍या क्रमांकावरील गौतमवर आली आणि त्याने ती समर्थपणे पेलताना, गंभीरपणे खेळत वीराट कोहली आणि नंतर कर्णधार धोनीला सुरेख साथ देत भारताची विजयी कूच जारी राखली. गौतमचे शतक केवळ ३ धावांची हुकले. पण भारताच्या विश्‍वचषक विजयातील त्याचे हे योगदान निश्‍चितच संस्मरणीय, मौल्यवान ठरले.

सौरव गांगुली : १९९९ मधील विश्‍वचषकात भारतीय संघाची कामगिरी विशेष उल्लेखनीय ठरली नाही पण कर्णधार सौरव गांगुलीची श्रीलंकेविरुध्दची तडफदार खेळी संस्मरणीय ठरली. सलामीवीर सदागोपन रमेश स्वस्तात बाद झाल्यावर सौरव गांगुलीने आक्रमणाची धुरा वाहत प्रतिस्पर्ध्यांपुढे ३७४ धावांचे तगडे आव्हान खडे केले. दादाने १५८ चेंडूत १७ चौकार आणि ७ षटकारांच्या आतषबाजीसह विश्‍वचषकातील वैयक्तिक सर्वोच्च १८३ धावा चोपतानाच राहुल द्रविडच्या साथीत ३१८ धावांची भागीही नोंदली. श्रीलंकेला भारताचे तगडे आव्हान पेलवता आले नाही आणि भारताने १५७ धावांनी मोठा विजय नोंदला. पण या स्पर्धेत भारतीय संघ विशेष चमक दर्शवू शकला नाही. भारतीय संघ सहाव्या क्रमावर घसरला पण गांगुलीची तुफानी फलंदाजी चाहत्यांच्या विस्मृतीत जाणे अशक्य होय!
भारतीय फलंदाजांची या विश्‍वचषकातील यशस्वी खेळी युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरावी!