शंभरी पार

0
157

गोव्याने बघता बघता कोरोना रुग्णांची शंभरी पार केली. मांगूरहिल परिसरामध्ये स्थानिक संक्रमणाचा जो संशय होता तो तर खरा ठरला आहेच, परंतु तेथे गेलेल्या आरोग्य कर्मचार्‍यांवरही कोरोनाने घाला घातल्याचे दिसते आहे. मांगूरहिलचे हे प्रकरण कुठवर जाईल सांगता येत नाही. राज्याच्या कोविड उपचार व्यवस्थेचा बोजवारा उडवण्याइतपत अवघ्या दोन दिवसांत स्थिती गंभीर बनली हे लक्षात घेणे जरूरी आहे. गोव्यात सापडू लागलेले रुग्ण, दिवसागणिक येत असलेले शेकडो देशी व विदेशी प्रवासी आणि हळूहळू संपूर्ण लॉकडाऊन उठवण्याच्या दिशेने केंद्र सरकारचे सुरू असलेले प्रयत्न हे सारे लक्षात घेतल्यास येणार्‍या काळामध्ये गोव्यात कोरोनाचा सामना समर्थपणे करण्यासाठी खरोखरच सरकारकडून पराकोटीच्या आणि वेगवान प्रयत्नांची जरूरी आहे. नुसत्या सज्जतेच्या गमजा आता कामाच्या नाहीत. प्रत्यक्षात ही सज्जता यापुढेही दिसावी लागेल. आजवर रुग्णांचे प्रमाण अल्प होते, त्यामुळे राज्याच्या आरोग्य यंत्रणेने परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली. पण आता खरा कसोटीचा काळ सुरू झाला आहे.
कोविड रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन राज्य सरकार आता उत्तर गोव्यात आणखी एक कोविड इस्पितळ कार्यान्वित करण्याच्या विचारात आहे. शिवाय इतर काही इस्पितळे कोरोना रुग्णांसाठीच वेगळी काढण्याचाही सरकारचा विचार आहे. इस्पितळात उपचार घेणार्‍या लक्षणविरहित रुग्णांना घरी पाठवले, तरी देखील दिवसागणिक वाढत चाललेली रुग्णसंख्या लक्षात घेता सध्याची व्यवस्था पुरी पडणारी नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोविड इस्पितळामध्ये नुसती खाटांची संख्या वाढवणे पुरेसे नसते. तेवढ्या संख्येने वाढणार्‍या रुग्णांवर उपचार करण्यासाठी तेवढ्या प्रमाणात तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध करणे हे खरे सरकारसाठी आव्हानात्मक आहे. दुसरे आव्हान सध्या निर्माण झालेले दिसते आहे ते म्हणजे या आरोग्य कर्मचार्‍यांच्या सुरक्षेचे. मांगूरहिलमध्ये सॅनिटायझेशन आणि कोविड तपासणीसाठी गेलेल्या आरोग्य कर्मचार्‍यांनाच कोरोनाचा संसर्ग होणे ही अतिशय गंभीर बाब आहे. हे कसे घडले त्याची चौकशी करून त्यातील त्रुटी ताबडतोब दूर साराव्या लागतील. या कर्मचार्‍यांपाशी योग्य दर्जाची प्रतिबंधात्मक साधने होती का, त्यांच्याकडून खबरदारीच्या उपायांचे योग्य प्रकारे पालन होत होते का, या गोष्टींची चौकशी करून यापुढील काळात तरी आरोग्य खात्याचेच कर्मचारी कोरोनाबाधित होऊ नयेत यासाठी आवश्यक साधने व कार्यपद्धती आखून द्यावी लागेल.
मांगूरहिलच्या आणि कळंगुटच्या कोरोना रुग्णांनी एक गोष्ट उघडी पाडली आहे ती म्हणजे गोव्याच्या सीमांवरील सध्याची नाकाबंदी अजूनही पुरेशी कार्यक्षम नाही. मांगूरच्या मच्छिमाराला ज्याच्यामुळे कोरोना संसर्ग झाला, ती परराज्यातील व्यक्ती गोव्यात आली होती की त्या मच्छिमाराच्या कुटुंबातील कोणी परराज्यात जाऊन आलेले होते या कोड्याचा उलगडा अद्याप झालेला नाही. हा संसर्ग गोव्याबाहेरील व्यक्तीकडून झालेला आहे हा सरकारचा तर्क असेल तर मग सीमाबंदी असताना हा संसर्ग कसा झाला याचे उत्तरही अर्थातच द्यावे लागेल.
कळंगुटमध्ये जी वयोवृद्ध महिला कोरोनारुग्ण आढळली, तिच्यासंदर्भात तर काही गंभीर प्रश्न उपस्थित होतात. ही महिला मुंबईहून कोविड तपासणीविना राज्यात प्रवेश कसा करू शकली? मुख्यमंत्री म्हणतात त्याप्रमाणे ही नुसती मानवी चूक म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरणार नाही. कोणत्या राजकारण्याने तिला गोव्यात सुलभरीत्या प्रवेश करू दिला होता का? म्हापशाच्या इस्पितळात तिची कोविड तपासणी होण्यापूर्वीच ती घरी कशी जाऊ शकली? या प्रश्नांची उत्तरे जनतेला आता हवी आहेत. ज्या विवाहसोहळ्याच्या निमित्ताने सदर महिला गोव्यात आली होती, तेथे नेमके किती लोक उपस्थित होते, त्यातले व्हीआयपी पाहुणे कोण होते हेही सरकारने जरूर तपासावे. कोरोनासंदर्भात गोव्याला येथील राजकारणीच एक दिवस खड्‌ड्यात घालतील असे आम्ही काही दिवसांपूर्वी म्हटले होते. कळंगुटच्या घटनेमध्ये अशाच राजकीय हस्तक्षेपाचा दाट संशय आहे व त्याचे निराकरण होणे जरूरी आहे.
गोव्याबाहेरून राज्यात येणार्‍यांच्या कोविड तपासणीसाठीच्या सुविधांमध्ये आणि चाचण्यांच्या प्रमाणामध्येही आता वाढ होणे गरजेचे आहे. सरकारने त्या दृष्टीने तयारीही सुरू केली आहे. गोमेकॉतील व्हायरोलॉजी लॅबमध्ये नवे अत्याधुनिक यंत्र दाखल होणार आहे, ज्याद्वारे चाचण्यांची संख्या वाढवता येईल. रस्तामार्गे येणार्‍या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन विर्नोड्याच्या संत सोहिरोबानाथ सरकारी महाविद्यालयात प्रवाशांचे लाळेचे नमुने घेतले जाणार आहेत. कोविड चाचण्यांवरील ताण जरी वाढलेला असला तरी नुसत्या प्राथमिक ट्रूनॅट स्क्रिनिंग चाचणी अहवालांवर विसंबून निष्कर्ष काढण्याजोगी परिस्थिती नाही. गोमेकॉतील आरटीपीसीआर चाचण्या हाच कोरोना आहे की नाही हे ठरवण्याचा खात्रीशीर उपाय आहे. तेथे चोवीस तास काम चाललेले आहे. तेथील कर्मचारी खरोखर प्रशंसेस पात्र आहेत. सरकारने आणि जनतेनेही त्यांचे मनोबल वाढविणे जरूरी आहे.
कोरोनाच्या गोव्यातील वाढत्या रुग्णसंख्येबाबत एक गोष्ट लक्षात आलेली आहे ती म्हणजे ज्या स्थानिक नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली, ते थेट कोविड इस्पितळात जाऊन तपासणी करण्याऐवजी खासगी डॉक्टर अथवा इस्पितळात धाव घेत आहेत. कळंगुट येथील महिलेनेही आधी म्हापसा येथील खासगी इस्पितळात तपासणी करून घेतली होती व नंतरच संशयावरून तिला कोविड चाचणीसाठी पाठवण्यात आले. नागरिकांची ही वृत्ती अतिशय घातक आहे, कारण यामुळे कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. साधा सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणांसाठी कोविड चाचणीची जरूरी जरी नसली, तरी किमान जे लोक बाहेरून आलेले आहेत वा ज्यांचा बाहेरील व्यक्तींशी संपर्क आलेला आहे, त्यांनी तरी कोरोनासंदर्भात संशय येताच थेट कोविड इस्पितळ गाठण्याची ही खबरदारी घ्यायला नको?