भारतासमोर पराभव टाळण्याचे आव्हान

0
216

>> मालिकेत २-१ अशी आघाडी घेण्याच्या दिशेने ऑस्ट्रेलियाची कूच

>> मोक्याच्या क्षणी रोहित परतला तंबूत

सलामीवीर रोहित शर्मा याने मोक्याच्या क्षणी विकेट फेकल्यामुळे टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसर्‍या कसोटी सामन्यात पराभव टाळण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी ४०७ धावांचे विशाल लक्ष्य समोर ठेवल्यानंतर चौथ्या दिवसअखेर भारताने २ बाद ९८ अशी मजल मारली आहे. खेळ संपण्यास केवळ काही षटके शिल्लक असताना रोहितने अर्धशतकानंतर आपला आवडता ‘पूल’ खेळण्याच्या नादात सीमारेषेवर स्टार्ककडे सोपा झेल दिला.

भारताचे सलामीचे फलंदाज रोहित शर्मा (५२) तर शुभमन गिल (३१ धावा) माघारी परतले आहेत. सध्या खेळपट्टीवर अजिंक्य रहाणे ४ तर पुजारा ९ धावांवर टिकून आहेत.
शुभमन गिल व रोहित यांनी संघाला ७१ धावांची सलामी दिली. गिल वैयक्तिक ३१ धावांवर झेलबाद झाला. यानंतर अनुभवी रोहित शर्माने अर्धशतक झळकावले. त्याने ९८ चेंडूंचा सामना करताना ५ चौकार व १ षटकार लगावला. परंतु, संघाला गरज असताना बेजबाबदार फटका खेळून त्याने आपली विकेट बहाल केली. रोहित नाबाद असता तर भारताला विजयाची संधी असती. परंतु, खेळपट्टीवर न स्थिरावलेल्या दोन्ही खेळाडूंना आज सकाळच्या सत्रात खेळावे लागणार असल्याने भारतासमोर विजयापेक्षा पराभव टाळण्याचे आव्हान असेल.

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने कॅमेरून ग्रीन याच्या आक्रमक ८४ धावा तसेच लाबुशेन व स्मिथ यांच्या अर्धशतकांवर आरुढ होत आपला दुसरा डाव ६ बाद ३१२ धावांवर घोषित केला. बदली यष्टिरक्षक वृध्दिमान साहा याने सुरेख यष्टिरक्षण करत चार झेल घेतले.

धावफलक
ऑस्ट्रेलिया पहिला डाव ः सर्वबाद ३३८
भारत पहिला डाव ः सर्वबाद २४४
ऑस्ट्रेलिया दुसरा डाव ः (२ बाद १०३ वरून) ः स्टीव स्मिथ पायचीत गो. अश्‍विन ८१, मार्नस लाबुशेन झे. साहा गो. सैनी ७३, मॅथ्यू वेड झे. साहा गो. सैनी ४, कॅमेरून ग्रीन झे. साहा गो. बुमराह ८४, टिम पेन नाबाद ३९, अवांतर ८, एकूण ८७ षटकांत ६ बाद ३१२ घोषित
गोलंदाजी ः जसप्रीत बुमराह २१-४-६८-१, मोहम्मद सिराज २५-५-९०-१, नवदीप सैनी १६-२-५४-२, रविचंद्रन अश्‍विन २५-१-९५-२
भारत दुसरा डाव ः रोहित शर्मा झे. स्टार्क गो. कमिन्स ५२, शुभमन गिल झे. पेन गो. हेझलवूड ३१, चेतेश्‍वर पुजारा नाबाद ९, अजिंक्य रहाणे नाबाद ४, अवांतर २, एकूण ३४ षटकांत २ बाद ९८
गोलंदाजी ः मिचेल स्टार्क ६-०-२७-०, जोश हेझलवूड ८-३-११-१, पॅट कमिन्स ९-१-२५-१, नॅथन लायन ९-३-२२-०, कॅमेरून ग्रीन २-०-१२-०

वर्णद्वेषी शेरेबाजी करणार्‍यांना मैदानातून हाकलले
भारताचे प्रमुख जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह व मोहम्मद सिराज यांच्यावर मैदानातील एका भागातून सातत्याने वर्णद्वेषी शेरेबाजी होत असल्याची तक्रार भारतीय संघ व्यवस्थापनाने ९ रोजी सामनाधिकार्‍यांकडे केली होती. सामन्याच्या चौथ्या दिवशी देखील या परिस्थितीत बदल न झाल्याने खेळ थांबवून सहा प्रेक्षकांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. सुरक्षा रक्षक व न्यू साऊथ वेल्सच्या पोलिसांनी त्यांना मैदानाबाहेर नेले. त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यांच्यावर आजीवन बंदी घातली जाऊ शकते.

जडेजा करणार फलंदाजी

संघाला दुसर्‍या डावात गरज भासल्यास फलंदाजी करणार असल्याचे रवींद्र जडेजा याने स्पष्ट केले आहे. संघ व्यवस्थापनानेदेखील याला दुजोरा दिला आहे. वेदनाशामक इंजेक्शन घेऊन जडेजा फलंदाजीस उतरू शकतो. दुसरीकडे जडेजा हा इंग्लंडविरुद्धच्या आगामी पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांना मुकणार असल्याचे बीसीसीआयने जाहीर केले. जडेजाच्या डाव्या बोटाच्या अंगठ्याला फ्रॅक्चर असून किमान चार ते सहा आठवडे जडेजा क्रिकेटपासून दूर राहील.