आम आदमी पक्ष भाजपची ‘बी’ टीम : कॉंग्रेस

0
267

आम आदी पक्षाला कुठल्याही विरोधी पक्षाबरोबर युती करण्यात रस नसून विरोधी पक्षांची मते फोडून भाजपला विजयी करणे हाच त्यांचा अजेंडा आहे हे आपच्या नेत्यांनी कॉंग्रेससोबत निवडणूकपूर्व युती करण्यास आपणाला रस नाही हे विधान करत परत एकदा सिद्ध केल्याचा आरोप काल कॉंग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी केला. आप ही भाजपची ‘बी’ टीम आहे ही गोष्ट यापूर्वीही स्पष्ट झाली असल्याचे चोडणकर म्हणाले.

आम आदमी पक्षाशी संबंधित बर्‍याच लोकांनाही कॉंग्रेसने आपशी युती करावी असे वाटते मात्र, आपला भाजपला मदत करायची असून ते कॉंग्रेसबरोबर कधीच युती करणार नाहीत हे आम्हाला माहिती होते. आता आपशी संबंधित लोकांनाही राहुल म्हांबरे यांनी कॉंग्रेसबाबत जे विधान केले आहे त्यावरून वरील बाब कळून चुकली असल्याचे चोडणकर म्हणाले. आपण आप संबंधी निवडणूकपूर्व युतीस कॉंग्रेस तयार असल्याचे जे म्हटले होते तो त्यांना उघडे पाडण्याच्या डावपेचाचा एक भाग असल्याचे चोडणकर यांनी स्पष्ट केले. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळीही कॉंग्रेसने आपबरोबर निवडणूकपूर्व युती करण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी आपण आपल्या स्थानिक नेत्यांबरोबर पाचवेळा बैठकाही घेतल्या होत्या. मात्र दक्षिण गोव्याची जागा कॉंग्रेसने आपसाठी सोडावी असा प्रस्ताव आपने दिल्याने बोलणी सफल होऊ शकली नव्हती, असे चोडणकर म्हणाले. आप ही भाजपची ‘बी’ टीम आहे. ही बाब आता हळुहळू उघड होऊ लागली असल्याचे ते म्हणाले. माजी निमंत्रक एल्विस गोम्स व सरचिटणीस प्रदीप पाडगावकर यांनीही पक्षातून बाहेर पडताना तसा आरोप केल्याचे चोडणकर यांनी म्हटले.

आंदोलकांवर दडपशाही
राज्यातील डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार अत्यंत असंवेदनशील बनलेले असून ते आपल्या हक्कांसाठी लोकशाही पद्धतीने आंदोलने करणार्‍या लोकांवर पोलिसी बळाचा वापर करून दडपशाही करत असल्याचा आरोप गिरीश चोडणकर यांनी केला.

सुभाष वेलिंगकर यांचे पुत्र शैलेंद्र वेलिंगकर यांना पोलिसांनी ज्या अमानुषपणे मारहाण केली त्यावरून सावंत सरकार किती असंवेदनशील बनले आहे व पोलिसी बळाचा वापर करून ते अशाप्रकारे दडपशाहीचा अवलंब करीत आहे हे दिसून येत असल्याचे चोडणकर म्हणाले. पोलिसांना कायदा हातात घेण्याचा अधिकारही नसून लोकांना शिक्षा करणे हे पोलिसांचे काम नाही. शैलेंद्र वेलिंगकर यांना पोलिसानी केलेली मारहाण हा खुनाचा प्रयत्न असल्याचा आरोप यावेळी चोडणकर यांनी केला. या मारहाणीची चौकशी केली जावी तसेच या मारहाणीत त्यांना झालेल्या जखमांची व दुखापतीची तपासणी करून अहवाल सादर करण्यासाठी डॉक्टरांच्या एका पथकाची स्थापना केली जावी, अशी मागणीही चोडणकर यांनी यावेळी केली.