एटीकेएमबी- मुंबईमध्ये आज महत्त्वपूर्ण सामना

0
238

इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात आघाडीच्यादृष्टिने महत्त्वाची लढत सोमवारी मुंबई सिटी एफसी आणि एटीके मोहन बागान यांच्यात फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर होणार आहे.
सध्या मुंबई सिटी आघाडीवर असून त्यांचे २२ गुण आहेत. एटीकेएमबी दोन गुणांनी मागे आहे. सातत्यपूर्ण फॉर्म राखलेल्या एटीकेएमबीची सर्वांत मोठी कसोटी या लढतीत लागेल. दोन्ही संघ पहिल्या दोन क्रमांकांवर असल्यामुळे तीन गुणांना दुप्पट महत्त्व प्राप्त झालेले असेल. या लढतीमुळे मोसमाच्या दुसर्‍या टप्प्याची दिशा ठरेल. आघाडीशिवाय आशियाई चॅम्पियन्स लीग पात्रतेच्यादृष्टिने सुद्धा ही लढत महत्त्वाची आहे. बाद फेरी सुरु होण्यापूर्वी हा मुद्दा आघाडीवरील संघांसाठी प्रेरणादायी असतो.

मुंबई सिटीने आतापर्यंत सर्वाधिक १६ गोल केले आहेत. त्यांची आघाडी फळी स्पर्धेत सर्वोत्तम ठरली असून संधीचे गोलमध्ये रुपांतर करण्याची त्यांची टक्केवारी १५.८४ आहे. मागील आठ सामन्यांत त्यांनी गोल केले आहेत. दुसरीकडे एटीकेएमबीचा बचाव निःसंशयपणे सर्वोत्तम ठरला आहे. नऊ पैकी सात सामन्यांत त्यांनी ‘क्लीन शीट’ राखल्या आहेत. आतापर्यंत खुल्या खेळात त्यांच्याविरुद्ध गोल झालेला नाही.

ही लढत मुंबई सिटीचे आक्रमण विरुद्ध एटीकेएमबीचा बचाव अशी रंगणार असल्याचे आकडेवारी दर्शविते. एटीकेएमबीचे प्रशिक्षक अँटोनिओ लोपेझ हबास यांनी मात्र हा मतप्रवाह फेटाळून लावला. त्यांनी सांगितले की, मुंबईचा संघ केवळ आक्रमण करणारा आहे असे मला वाटत नाही. खेळ परिस्थितीनुरूप पुढे नेण्याचे आणि प्रतिआक्रमण रचण्याचे त्यांचे कौशल्य चांगले आहे. ते नेहमीच आगेकूच करीत खेळतात. त्यामुळे त्यांना रोखणे फार अवघड आहे. हा सामना मात्र आक्रमण विरुद्ध बचाव असा असल्याचे मला वाटत नाही, कारण फुटबॉलचा खेळच मुळी आक्रमण आणि बचावाचा असतो. दोन्ही संघांना एका बाजूकडून दुसर्‍या बाजूला स्थित्यंतर साधावे लागते. हबास यांनी पुढे सांगितले की, लढतीचे महत्त्व त्यावेळच्या क्षणावर अवलंबून असते. आता ही लढत पहिल्या दोन संघांमधील आहे. दोन किंवा तीन आठवड्यांनी या लढतीला कदाचित एवढेच महत्त्व मिळणार नाही, पण आमची कल्पना नेहमीसारखा खेळ करण्याची आहे.

मुंबई सिटीचे प्रशिक्षक सर्जिओ लॉबेरा यांनी सलामीच्या लढतीमधील पराभवानंतर संघ अपराजित ठेवला आहे. स्पेनच्या या प्रशिक्षकांची खरी कसोटी एटीकेएमबीविरुद्ध लागलेली असेल. एटीकेएमबी सुद्धा मागील पाच लढतींत अपराजित आहे. ही लढत लीगची दिशा ठरवेल असे मात्र लॉबेरा यांना वाटत नाही. त्यांनी सांगितले की, हा सामना महत्त्वाचा असेल, पण निर्णायक महत्त्वाचा असल्याचे मला वाटत नाही. आता लिग निम्मीच झाली आहे आणि या लीगमध्ये काहीही घडणे शक्य आहे. थोड्या कालावधीत काहीही बदलू शकते. खेळावर लक्ष केंद्रीत ठेवणे आणि खेळात सुधारणा करणे या सर्वांत महत्त्वाच्या गोष्टी आहेत.

लॉबेरा यांच्यासमोर खेळाडूंच्या दुखापतींची कोणतीही समस्या नाही, पण अहमद जाहू याच्याशिवाय त्यांना खेळावे लागेल. अहमदला मोसमात दुसर्‍यांदा लाल कार्डला सामोरे जावे लागले. लॉबेरा यांनी संघाच्या खेळण्याची तत्त्वप्रणाली वैयक्तिक नव्हे तर सांघिक पातळीवर विकसित केली आहे. त्यांनी सांगितेल की, अहमद आमच्यासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे, पण आमच्याकडे फार चांगला संघ आहे आणि याबाबतीत कोणतीही सबब असू शकत नाही. सांघिक कामगिरी माझ्यासाठी सर्वाधिक महत्त्वाची आहे. हा वैयक्तिक कामगिरीचा मुद्दा नसतो. आमच्याकडे चांगले खेळाडू आहेत, पण तुम्ही संघ म्हणून खेळण्याची गरज असते.
ते पुढे म्हणाले की, तुम्ही एक सामना संपवता तेव्हा पुढील सामना सर्वांत महत्त्वाचा असतो. उद्या सुद्धा हीच स्थिती असेल. आम्ही एका चांगल्या संघाविरुद्ध खेळणार असल्यामुळे सामना अवघड असेल. एटीकेएमबीचा संघ चांगली कामगिरी करतो आहे.