भारतात कोठेही हल्ला करू शकतो

0
98

>> आंतरराष्ट्रीय दहशतवादी सलाहुद्दिनची दर्पोक्ती

अमेरिकेने नुकताच आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केलेला हिजबुल मुजाहिदिनचा म्होरक्या सय्यद सलाहुद्दिन याने काल पाकिस्तानमधील एका पाकिस्तानी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपण भारतात याआधी अनेक दहशतवादी हल्ले केल्याचे तसेच यापुढेही असे हल्ले करू शकतो अशी दर्पोक्ती केली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वरील घोषणा केल्यानंतर सलाहुद्दिन याची ही पहिलीच मुलाखत आहे. मुलाखत घेतलेल्या ठिकाणी बुरहान वानी याचे छायाचित्र प्रदर्शित करण्यात आले होते.
उर्दु भाषेतील या मुलाखतीवेळी त्याने आपले देशात अनेक ठिकाणी समर्थक असल्याचा दावा केला. या समर्थकांनी आपल्या सांगण्यावरून अनेक हल्ले केले असल्याचेही तो म्हणाला. ज्यांनी काश्मीरात सुरक्षा दलांना पाठिंबा दिला आहे ते आपले लक्ष्य असतील आणि त्यात अब्दुल्ला व मुफती कुटुंबियेही असतील असा इशाराही त्याने दिला.
इस्रायलचे भारताबरोबरील वाढते संबंध हेही आपले लक्ष्य आहे. भारतातील कोणत्याही लक्ष्यावर कोणत्याही वेळी हल्ला करण्याची आपली ताकद व क्षमता आहे असा दावा सलाहुद्दिनने केला आपले भारताबाहेरही मोठ्या संख्येने समर्थक आहेत. त्यामुळे इस्रायला सुध्दा आपण हिसका दाखवू शकतो असे तो म्हणाला.
भारताने काश्मीरमधील सुरक्षा दलांना तीन दिवसांसाठी काढून घ्यावे आणि नंतर तेथे निवडणुका घ्याव्यात असे आपण आव्हान देतो असे सलाहुद्दिनने सांगितले. या स्थितीनंतर काश्मीरी जनता कसे मतदान करते ते पहा. सय्यद गिलानी, मिरवाईज, शब्बीर अहमद शहा, यासिन मलिक किंवा सय्यद सलाहुद्दिन हे अशा वेळी नेते म्हणून निवडून येतील असा दावा त्याने केला. तेव्हाच संपूर्ण जगाला कळून येईल की काश्मीरचा अस्सल नेता कोण आहे असे भाष्य त्याने केले.
ट्रम्प यांच्या घोषणेनंतर आपल्या संघटनेचे व स्वत: आपले आरोग्य अधिक सुधारले असल्याचे तो म्हणाला.