भाजपकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू

0
101

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश भाजपने २०१९च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली असून पक्षाने आतापर्यंत केलेल्या संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यासाठी शनिवार दि. ८ रोजी पक्षाचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय गोव्यात येत असल्याची माहिती प्रदेश भाजप अध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

शहा यांच्या गोवा दौर्‍याला गोमंतकीयांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. निवडणुकीची कशा पध्दतीने तयारी करावी, याचे मार्गदर्शन शहा यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना केल्याचे तेंडुलकर यांनी सांगितले.
दाबोळी विमानतळाच्या परिसरात भाजपने सभा आयोजित केली नव्हती, लोक उत्स्फूर्तपणे तेथे जमा झाले. त्यामुळे ऐनवेळी तेथे व्यासपीठ उभारावे लागले. त्यासाठी संबंधित प्राधिकरणाकडून परवानगी घेण्याचा प्रश्‍नच नाही. भविष्यकाळात कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी तेथे आल्यानंतर त्यांचे लोकांनी स्वागत केले तर कोण रोखणार, असा प्रश्‍न तेंडुलकर यांनी केला. शहा यांच्यावरील कार्यक्रमाचा जनतेवर सकारात्मकच परिणाम झाल्याचे त्यांनी एका प्रश्‍नावर सांगितले.
‘त्या’ सभेचे आयोजन भाजपकडून नव्हे काही बिगर गोमंतकीय नेते गोव्यात येऊन राज्यातील धार्मिक सलोखा बिघडू पहात आहेत, या उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्या विधानाची पक्षाने दखल घेतली काय, असा प्रश्‍न विचारला असता, शहा यांच्या बैठकांमध्ये हा विषय आलाच नाही, असे सचिव सदानंद तानावडे यांनी सांगितले.