चोवीस तासांत कोरोनाने २ मृत्यू, २१३ बाधित

0
90

राज्यात कोरोना विषाणूमुळे काल मंगळवारी दोघांचा मृत्यू झाला. तर २१३ नवे रुग्ण आढळले. राज्यात ह्या महामारीमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ३०४८ एवढी झाली आहे. तर सध्या राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या २२४१ एवढी खाली आली आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १,६६,४४९ एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८२ टक्क्यांवर पोहोचले आहे.

चोवीस तासांत २८६ कोरोनामुक्त
गेल्या चोवीस तासांत राज्यात २८६ जण बरे झाले आहेत. तर इस्पितळांतून काल २१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या १,६१,१६० एवढी झाली आहे, अशी माहिती आरोग्य खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे. तसेच काल नव्याने इस्पितळात ३४ जणांना भरती करण्यात आले.
काल दिवसभरातील चोवीस तासांत राज्यात एकूण ४०८८ एवढ्या स्वॅबच्या चाचण्या करण्यात आल्या. काल कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्याने १७९ जणांनी घरी विलगीकरणाचा निर्णय घेतला.

दोघांचा मृत्यू
काल राज्यात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला. राज्यात कोरोना संक्रमणाचे प्रमाण काही अंशी कमी झाले असून कोरोना मुक्त होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांतील एकाचा मृत्यू बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात तर एकाचा दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात झाला.

आतापर्यंत इस्पितळात उपचार घेतलेल्यांची संख्या २८,०५९ एवढी असून गृहविलिनीकरणात राहिलेल्यांची संख्या १,१४,९१२ एवढी आहे. राज्यात आतापर्यंत ९,१८,०५४ एवढ्या लोकांची कोरोना संसर्गाची चाचणी करण्यात आलेली आहे.

सर्वाधिक रुग्ण फोंड्यात
राज्यात या घडीला सर्वाधिक रुग्ण हे फोंडा शहरात असून त्यांची संख्या १४९ एवढी आहे. त्या पोठापाठ मडगावात १४१, साखळी १२०, कांदोळी १०२, पणजी ८५, काणकोण ९६, चिंबल ८५, कुठ्ठाळी ८६, कुडचडे ७०, शिवोली ८१, वास्को ७४, खोर्ली ७३, पर्वरी ७४, धारबांदोडा ७३ अशी रुग्णसंख्या आहे.