भाजप सरकार बरखास्त करण्याची कॉंग्रेसची राज्यपालांकडे मागणी

0
61

>> कोविडप्रश्‍नी अपयशी ठरल्याचा आरोप

कोविड महामारीच्या दुसर्‍या लाटेपासून राज्यातील जनतेला वाचवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यास पूर्णपणे अपयशी ठरलेले डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्त्वाखालील राज्यातील भाजप सरकार बरखास्त करावे, अशी मागणी प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल एका पत्राद्वारे गोव्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली आहे.

महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली येथे कोरानाच्या दुसर्‍या लाटेने कहर केल्याच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने गोव्याच्या सीमा बंद कराव्यात व त्या राज्यांतील लोकांना गोव्यात येण्यापासून रोखावे, अशी मागणी गोव्यातील विरोधी पक्ष, एनजीसी व राज्यातील बुद्धिजीवी लोकांनी केली असतानाही मुख्यमंत्री सावंत यांनी या मागणीकडे दुर्लक्ष करत राज्याच्या सीमा सर्वांसाठी खुल्या ठेवल्या.
परिणामी परराज्यातून येणार्‍या लोकांमुळे गोव्यातील लोकांना मोठ्या संख्येने कोरोनाचा संसर्ग झाला व गोव्यातील हजारो लोक मृत्युमुखी पडल्याचे चोडणकर यांनी राज्यपालाना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. आपल्या दुराग्रही स्वभावामुळे व अयोग्य प्रशासनामुळे राज्यातील मृत्यूमुखी पडलेल्या लोकांचा जगण्याचा हक्क त्यांनी हिरावून घेतल्याचा आरोप चोडणकर यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या अक्षम्य चुकीमुळे त्यांच्या सरकारला सत्तेवर राहण्याच्या अधिकार नसल्याने त्यांचे सरकार तुम्ही बरखास्त करावे, अशी मागणी चोडणकर यांनी आपल्या पत्रातून राज्यपालांकडे केली आहे.