चक्रीवादळामुळे ओडिशात तिघांचा मृत्यू

0
122

>> पश्‍चिम बंगाल, ओडिशात २० लाख नागरिकांना फटका

यास चक्रीवादळामुळे ओडिशात शेकडो घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेतात पाणी साचल्याने पिकांचेदेखील नुकसान झाले आहे. या वादळादरम्यान १४५ प्रति तास वेगाने वारे वाहत होते. या वादळामुळे ओडिशात तिघांचा मृत्यू झाला आहे. या वादळाचा फटका ओडिसा, पश्चिम बंगाल आणि झारखंडला सर्वाधिक बसला आहे. तिन्ही राज्यांमधील लाखो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले, की वादळाने राज्यातील बर्‍याच भागाला तडाखा बसला असून पूर्व मेदिनीपूर, दक्षिण २४ परगणा, उत्तर २४ परगणा, पश्चिम मेदिनीपूर, हावडा, हुगळी, पुरुलिया, नैदा येथील लोकांना घरातच थांबण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कोलकात्यातील सर्व उड्डाण पूल बंद करण्यात आले आहेत.

२० लाख नागरिकांना फटका
पश्‍चिम बंगाल आणि ओडिशाला तडाखा दिलेल्या यास चक्रीवादळामुळे दोन्ही राज्यातील मिळून २० लाखांहून अधिक नागरिकांना फटका बसला आहे. मुसळधार पाऊस आणि घरे कोसळल्याने ४ नागरिकांचा मृत्यू झाला असून यातील ३ मृत्यू ओडिशात तर एकाचा पश्‍चिम बंगालमध्ये झाला आहे.

उत्तर प्रदेश, बिहार अलर्ट
‘यास’ चक्रीवादळ पुढे सरकले असून ते झारखंडमध्ये दाखल झाले आहे. झारखंडमध्ये मुसळधार पाऊस पडत असून यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुसरीकडे हवामान विभागाने उत्तर प्रदेश, बिहारसह अनेक राज्यांना अलर्ट जारी केला आहे.

झारखंडमध्ये पाऊस
चक्रीवादळामुळे संपूर्ण झारखंडमध्ये पाऊस पडत असून रांचीमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. चक्रीवादळामुळे रांचीत बुधवारपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. स्थानिक नद्यांची पाणी पातळीत वाढ होत आहे. चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता झारखंडमधील काही जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफच्या ८ कंपन्या तैनात आहेत.

बिहारमध्येही पाऊस
यास चक्रीवादळाचा फटका बिहारलाही बसत असून बिहारमधील भागलपूर, सुपौल, कटिहार आणि पूर्णियासह अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वार्‍यांसह जोरदार पाऊस पडत होता.

पंतप्रधान मोदींचा आज
पश्‍चिम बंगाल, ओडिसा दौरा

‘यास’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शुक्रवारी ओडिसा व पश्चिम बंगालच्या दौर्‍यावर जाणार आहेत. पंतप्रधान मोदी सर्वप्रथम भुवनेश्वर येथे आढावा बैठक घेतील. त्यानंतर बालासोर, भद्रक आणि पूर्व मिदनापूर या भागाची हवाई पाहणी करतील व त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये आढावा बैठक घेतील.