भाजपविरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न ः कांदोळकर

0
138

भाजपच्या विरोधात असलेल्या राजकीय पक्षांना टीम गोवाच्या बॅनरखाली एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस तसेच इतर समविचारी पक्षांशी निवडणूक आघाडी करण्यावर विचार केला जात आहे, असे प्रतिपादन काल गोवा फॉरवर्डचे कार्याध्यक्ष किरण कांदोळकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले.

कॉँग्रेस पक्षातून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या दहा आमदारांना राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिल्यास राष्ट्रवादी कॉँग्रेसशी निवडणूक आघाडी केली जाणार नाही, असे कार्याध्यक्ष कांदोळकर यांनी स्पष्ट केले.

राज्यातील आगामी अकरा नगरपालिका आणि पणजी महानगरपालिकेच्या निवडणुकीत पराभव अटळ असल्याने भाजप पक्ष संघटन आणि भाजप सरकार घाबरले असून पालिका निवडणूक पक्षीय पातळीवर न घेण्याचा निर्णय घेतला आहे. पालिका प्रभाग आरक्षणाचा घोळ करण्यात आला आहे, असा आरोप गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केला.

मडगाव नगरपालिका निवडणुकीसाठी कॉँग्रेसचे नेते तथा आमदार दिगंबर कामत, आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांच्या सहकार्याने निवडणूक लढविली जाणार आहे. मडगाव पालिका निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली आहे. म्हापसा नगरपालिका निवडणुकीची जबाबदारी कार्याध्यक्ष किरण कांदोळकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. पेडणे नगरपालिका निवडणूक गोवा फॉरवर्डमध्ये नव्याने प्रवेश केलेल्या प्रशांत गडेकर यांच्या नेतृत्वाखाली लढविली जाणार आहे, असेही सरदेसाई यांनी सांगितले.

गोवा फॉरवर्डचा मांडवी नदीतील कॅसिनोना विरोध नाही. ज्यांनी १०० दिवसांत मांडवी नदीतून कॅसिनो हटविण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यांनाच जाब विचारण्याची गरज आहे. असे सरदेसाई यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या दोन आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राबाबत स्पष्टीकरण करण्याची गरज आहे. राज्यात कॉँग्रेस पक्ष अस्तित्वात नाही, असे वक्तव्य भाजप आमदारांनी प्रतिज्ञापत्रात केले आहे. तसेच, मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी मोपा विमानतळाबाबत केलेल्या वक्तव्याबाबत स्पष्टकरण करण्याची गरज असल्याचेही सरदेसाई यांनी सांगितले.