भाजपचे आजपासून लाभार्थी संपर्क अभियान

0
7

भारतीय जनता पक्षातर्फे 1 ते 4 मार्चदरम्यान लाभार्थी संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या राज्यातील 30 हजार लाभार्थींची भेट घेण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी भाजप मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल दिली.

केंद्र सरकारच्या योजनेच्या लाभार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ताक्षरातील पत्रे वितरित केली जाणार आहेत. मोदी यांच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती मंत्री, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते घरोघरी जाऊन लाभार्थ्यांना देणार आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हे सुध्दा या अभियानात सहभागी होणार आहेत, असेही तानावडे यांनी सांगितले.

येत्या 6 मार्च रोजी नारी शक्ती वंदन कार्यक्रमांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील महिलांशी आभासी पद्धतीने संवाद साधणार आहेत. राज्यातील चाळीस विधानसभा मतदारसंघात स्क्रीनची व्यवस्था करून पंतप्रधानांचे भाषण ऐकण्याची संधी महिलांना दिली जाणार आहे, असेही तानावडे यांनी सांगितले.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री तथा माजी खासदार चर्चिल आलेमाव हे भाजपचे हितचिंतक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मडगाव येथील सभेला आलेमाव यांनी उपस्थिती लावली होती; मात्र आलेमाव यांच्या भाजप प्रवेशाबाबत काही हालचाल नाही, असे तानावडे यांनी सांगितले.