भाजपची उमेदवारी कुणाला?

0
4

>> दिल्लीत नरेंद्र मोदी, अमित शहांच्या उपस्थितीत बैठक

>> नावे गुलदस्त्यात; पहिल्या उमेदवारी यादीची प्रतीक्षा

भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची पहिली बैठक काल नवी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात झाली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे उपस्थित होते. तसेच गोव्यातून या बैठकीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार सदानंद शेट तानावडे यांनी उपस्थिती लावली. या बैठकीत पहिल्या टप्प्यात ज्या 100 ते 120 जणांना उमेदवारी दिली जाणार आहे, त्यांच्या नावांवर पुन्हा खल झाला. गोव्यातील दोन्ही जागांसाठी ज्यांनी दावेदारी दाखल केली आहे, त्यांच्या नावांवरही विचारविनिमय झाला; मात्र काल रात्री उशिरापर्यंत त्यांची नावे जाहीर झाली नव्हती. आता उत्तर व दक्षिण गोव्यातून भाजपची उमेदवारी कुणाला मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी नेहमीप्रमाणे जय्यत तयारी सुरू केली आहे. भाजप उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर काल पुन्हा मोदी, शहांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये 100 ते 120 उमेदवारांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे भाजपची उमेदवारांची पहिली यादी शुक्रवार किंवा शनिवारपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे.
दक्षिण गोव्यातून भाजपची उमेदवारी कोणाला मिळते याबद्दल अधिक उत्सुकता आहे. माजी खासदार ॲड. नरेंद्र सावईकर, माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर हे शर्यतीत आघाडीवर आहेत.

दक्षिणेत मागील लोकसभा निवडणुकीवेळी वेगळे राजकीय समीकरण होते. त्यामुळे भाजपला पराभवाला तोंड द्यावे लागले होते. आता, राजकीय समीकरण बदलले आहे. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात असलेले मगो पक्ष, तसेच चंद्रकांत कवळेकर आणि दिगंबर कामत हे यावेळी भाजपच्या सोबत आहेत. उत्तर गोव्यातून श्रीपाद नाईक यांना पुन्हा एकदा संधी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या नावाबरोबरच आणखी दोघांची नावे चर्चेत आहेत.

मुख्यमंत्री काय म्हणाले?
या बैठकीसाठी गुरुवारी दुपारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे दाबोळी विमानतळावरून दिल्लीला रवाना झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दोन्ही उमेदवार ठरविण्यासाठी आपण दिल्लीत भाजप केंद्रीय पक्षश्रेष्ठींसोबतच्या बैठकीसाठी जात आहे. दोन्ही उमेदवार शुक्रवार (दि. 1 मार्च) निश्चित होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

तिरंगी लढती अपेक्षित
राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि आरजीपी अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. आरजीपीने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. काँग्रेसच्या उमेदवारांची नावे 1 मार्चला जाहीर होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या उमेदवारांची नावे नवी दिल्लीतून घोषित केली जाणार आहेत.