भाजपचा बडतर्फ आमदार कुलदिप सेनगरला जन्मठेप

0
124

>> उन्नाव अल्पवयीन बलात्कार प्रकरणी निवाडा जाहीर

उत्तर प्रदेशच्या उन्नाव येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी भाजपचा बडतर्फ आमदार कुलदिप सिंग सेनगर याला काल येथील न्यायालयाने जन्मठेप सुनावली. २०१७ मधील या प्रकरणावेळी पीडितेचे वय १७ वर्षे होते. जिल्हा न्यायाधीश धर्मेश शर्मा यांनी सेनगर याला एका महिन्याच्या आत दंड स्वरुपात २५ लाख रुपये न्यायालयाकडे जमा करण्याचा आदेशही दिला.

५३ वर्षीय आरोपी सेनगर याने बलात्काराच्या घटनेनंतर पीडितेला सतत धमक्या दिल्याचे निरीक्षण न्यायालयाने आपल्या निवाड्यात नोंदवले आहे. गेल्या सोमवारी न्यायालयाने सेनगरला दोषी जाहीर केले होते.

न्यायालयाने सीबीआयला आदेश दिला आहे की पीडिता व तिच्या कुटुंबियांना यापुढेही धमकावले जाण्याची शक्यता गृहीत धरून त्यांच्या जीवीताच्या सुरक्षिततेबाबत दर तीन महिन्यांनी आढावा घ्यावा. तसेच न्यायालयाने स्पष्ट केले की पीडिता व तिचे कुटुंबीय दिल्ली महिला आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या भाड्याच्या निवासात आणखी एक वर्ष वास्तव्य करतील. या भाड्यापोटी उत्तर प्रदेश सरकारने मासिक १५ हजार रु. भरावेत असा निर्देशही न्यायालयाने दिला.

आपल्या निवाड्यात न्यायालयाने म्हटले आहे की पीडितेने दिलेली सर्व माहिती ही सत्य होती. एका शक्तीशाली व्यक्तीविरोधातील पीडितेचे कथन सुस्पष्ट होते. मात्र ही बलात्काराची घटना २०१७ साली झाली असल्याने गेल्या ऑगस्टमध्ये पोक्सो कायद्यातील दुरुस्तीनुसार आरोपीला मृत्यूदंड ठोठावण्याची तरतूद सेनगर याला लागू होऊ शकली नाही.

या प्रकरणात सहआरोपी असलेल्या शशी सिंग या महिलेला न्यायालयाने निर्दोष सोडले. या कटात तिचा सहभाग असल्याचे सिद्ध करण्यात सीबीआयला अपयश आल्याने तिला सोडण्यात आले.

सेनगर याने लोकांचा
विश्‍वास गमावला ः न्यायालय
आरोपीला सौम्य शिक्षा देण्याची विनंती फेटाळताना न्यायालयाने म्हटले, ‘सेनगर हा एक आमदार म्हणून लोकसेवक होता. मात्र त्याने त्याला निवडून देणार्‍या लोकांचा विश्‍वास गमावला आहे.’ २५ लाखांच्या दंडासह आरोपीने नुकसान भरपाई म्हणून पीडितेच्या आईला १० लाख रु. देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे.