सांगेतील ‘त्या’ १७ गावांच्या समस्यांवर मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक

0
144

सांगे तालुक्यातील पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या गावातील लोकांची गार्‍हाणी ऐकून घेऊन त्यासंबंधी योग्य ती उपाययोजना करण्यासाठी काल सांगे मतदारसंघाचे आमदार प्रसाद गावकर, माजी आमदार सुभाष फळदेसाई व संबंधित गावातील लोकांबरोबर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी एक बैठक घेतली. या बैठकीला वन व पर्यावरण खात्यातील अधिकारी हजर होते.

पुढील बैठक ८-१० दिवसांत होणार आहे. तोपर्यंत जेवढी माहिती कागदोपत्री तयार करून सादर करता येईल ती केली जाणार आहे. नंतर त्यावर काय उपाययोजना करावी त्याचा निर्णय सरकार घेणार असल्याचे गावकर यांनी सांगितले. पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेली १६ ते १७ गावे सांगे तालुक्यात असल्याचे गावकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

यासंबंधी माहिती देताना प्रसाद गावकर म्हणाले, की चालू महिन्याच्या २० तारखेपर्यंत या प्रश्‍नावर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी तीन बैठका घेण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र, प्रत्यक्षात २० रोजी पहिलीच बैठक होऊ शकली. या बैठकीत पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या गावातील लोकांची गार्‍हाणी, त्यांच्या समस्या व अडीअडचणी मुख्यमंत्र्यांपुढे मांडण्यात आल्याचे गावकर म्हणाले.
स्थानिकांच्या ज्या समस्या आहेत त्यांची कागदोपत्री नोंद करून ती कागदपत्रे पुढील बैठकीत सरकारपुढे ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचे गावकर यांनी यावेळी सांगितले. पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या वन क्षेत्रात राहणार्‍या लोकांना घरे बांधता येत नाहीत. घरांचा विस्तार करता येत नाही. रस्ते बांधता येत नाहीत. पाण्यासाठी जलवाहिन्या घालता येत नाहीत. त्यामुळे त्या लोकांना कसे विविध अडचणींना सामोरे जावे लागते त्याची माहिती बैठकीत मुख्यमंत्री व वन अधिकार्‍यांसमोर ठेवल्याचे गावकर यांनी सांगितले.