राज्यात वर्षभरात ८४ किलो ड्रग्स जप्त ः पोलीस उपमहानिरीक्षक

0
111

पोलीस अमलीपदार्थ विरोधी विभाग आणि जिल्हा पोलिसांनी अमलीपदार्थ विरोधात जोरदार मोहीम सुरू असून यावर्षात आत्तापर्यंत अमलीपदार्थ प्रकरणी २०७ प्रकरणांची नोंद करून अंदाजे ८४ किलो अमलीपदार्थ जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस उपमहानिरीक्षक राजेश कुमार यांनी गोवा पोलीस स्थापन दिन सोहळ्यात बोलताना काल दिली.

राज्यात विदेशी स्थानबद्ध केंद्र सुरू केल्यानंतर बेकायदा वास्तव्य करणार्‍या ५० विदेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात यश मिळाले असून त्यातील ३५ विदेशी नागरिकांची त्यांच्या देशात परत पाठवणी करण्यात आली आहे. स्थानबद्ध केंद्रात असलेल्या १५ विदेशी नागरिकांची परत पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. बेकायदा वास्तव्य करणार्‍या विदेशी नागरिकांविरोधात जोरदार मोहीम राबविली जात आहे, असेही उपपोलीस महानिरीक्षक कुमार यांनी सांगितले.
पोलीस दलात नवीन ८५ वाहनांचा समावेश लवकरच केला जाणार आहे. गोवा पोलिसांचे गुन्हे तपासाचे प्रमाण ८५ टक्के एवढे आहे. पोलीस कर्मचार्‍यांकडून गुह्यांचा छडा लावण्यासाठी मेहनत घेतली जात आहे.

वर्षभरात ८९० पोलिसांना बढत्या देण्यात आल्या आहेत. ४४० पोलिसांना एमएसीपीएस मंजूर करण्यात आली आहे. नवीन भरती केलेले १०८ पोलीस शिपाई वाळपई येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत आहेत, असेही कुमार यांनी सांगितले.
पोलिसांकडून मानव तस्करीच्या विरोधात जोरदार कारवाई केली जात आहे. मानव तस्करीतून ८५ जणांची सुटका करण्यात आली आहे. पणजी आणि मडगाव येथे आपत्कालीन मदत केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहे. वेर्णा येथील फॉरेन्सिक प्रयोगशाळा पूर्णपणे कार्यान्वित करण्यात आली आहे, असेही कुमार यांनी सांगितले.