ब्लास्टर्ससमोर आज नॉर्थईस्टचे आव्हान

0
113

इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) शनिवारी येथील नेहरू स्टेडियमवर केरला ब्लास्टर्स एफसीसमोर नॉर्थईस्ट युनायटेडचे आव्हान असेल. ब्लास्टर्सला विजयाची नितांत गरज आहे.

सलामीला एटीकेला हरविल्यापासून ब्लास्टर्सला आठ सामन्यांत विजय मिळविता आलेला नाही. मागील मोसमातही त्यांना विजयी सलामीनंतर १४ सामन्यांत विजय मिळविता आला नव्हता. त्यामुळे अखेरीस त्यांच्या आशा संपुष्टात आल्याहोत्या.
ब्लास्टर्सचे नऊ सामन्यांत केवळ सात गुण आहेत. यापुढे त्यांना गुण गमावून चालणार नाही. एल्को शात्तोरी प्रशिक्षक असलेल्या ब्लास्टर्सचा घरच्या मैदानावरील फॉर्मही खराब राहिला आहे. त्यामुळे चाहत्यांची निराशा झाली आहे. गेल्या मोसमापासून येथे त्यांना १४ सामन्यांत केवळ १४ गुण मिळविता आले आहेत. मागील तीन सामने बरोबरीत सुटले आहेत.

स्पर्धेतील मागील सामन्यात त्यांना चेन्नईन एफसीविरुद्ध १-३ असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे शात्तोरी आपल्या आधीच्या संघाविरुद्ध जिंकण्यास आतूर असतील. त्यांच्यादृष्टीने महत्त्वाची बाब म्हणजे बार्थोलोम्यू ओगबेचे शनिवारी खेळण्याची अपेक्षा आहे. गेल्या मोसमात ओगबेचे नॉर्थईस्टकडून सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला होता. तो शात्तोरी यांच्यासह ब्लास्टर्सकडे दाखल झाला. गेल्या मोसमाप्रमाणे त्याला सफाईदार गोल करताना झगडावे लागत असले तरी तो भेदक खेळाडू आहे.

ब्लास्टर्सचा बचाव भक्कम राहिलेला नाही. त्यामुळे त्यांना केवळ एकदाच क्लीन शीट राखता आली आहे. ओडिशाच्या कमकुवत संघाविरुद्ध हे घडले. त्यांची मध्य फळी सुद्धा स्थिरावलेला नाही. त्यातच सर्जिओ सिदोंचा याच्या दुखापतीचा फटका बसला आहे.
साहल अब्दुल समद या कल्पक मध्यरक्षकाला बदली खेळाडू करण्यात आले आहे आणि ते आश्चर्यकारक ठरले आहे. मारीओ आर्क्वेसला मध्य फळीचा भार पेलावा लागेल.
नॉर्थईस्टही चांगल्या सुरवातीनंतर घसरला आहे. गेल्या चार सामन्यांत त्यांना विजय मिळविता आलेला नाही. दहा गुणांसह ते सहाव्या क्रमांकावर आहेत. स्टार स्ट्रायकर असामोह ग्यान याला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्यांच्या आघाडी फळीवर मर्यादा आल्या आहेत. लीगमधील सर्वाधिक कमी आठ गोल त्यांचे आहेत. गेल्या तीन सामन्यांत त्यांचा एकच गोल होऊ शकला. फेडेरिको गॅलेगो तंदुरुस्त झाल्यामुळे त्यांना जास्त संधी निर्माण करता येतील. रॉबर्ट जार्नी प्रशिक्षक असलेल्या संघाची बचाव फळीही विस्कळीत झाली आहे. वैयक्तिक चुकांचा त्यांना फटका बसला आहे. पहिल्या चार सामन्यांत त्याच्याविरुद्ध चारच गोल झाले होते. हेच त्यानंतरच्या चार सामन्यांत आठ गोल झाले.
मिस्लाव कोमोर्स्की, नीम दोर्जी तमांग अशा खेळाडूंना जास्त सातत्य राखावे लागेल. रेडीम ट्लांग आणि लालथाथांगा ख्वॉलह्रींग अशा तरुण खेळाडूंकडूनही आशा असतील.