जमशेदपूरविरुद्ध ओडिशाची सरशी

0
110

इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) ओडिशा एफसीने घरच्या मैदानावरील पहिल्या सामन्यात शानदार विजय नोंदविला. त्यांनी जमशेदपूर एफसीवर २-१ अशी मात केली. स्पेनचा ३२ वर्षीय स्ट्रायकर अरीडेन सँटाना याने पूर्वार्धात केलेले दोन गोल निर्णायक ठरले.

ओडिशाला घरच्या मैदानावरील आधीचे सामने पुण्यात खेळावे लागले होते. कलिंगा स्टेडियमवरील पहिल्या सामन्यात जोसेप गोम्बाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली ओडिशाने शानदार खेळ केला. जमशेदपूरने पेनल्टीवर बरोबरी साधूनही त्यांनी कच खाल्ली नाही. सामन्यातील तिन्ही गोल पहिल्या सत्रात झाले.

ओडिशाचा हा १० सामन्यांतील तिसरा विजय असून तीन बरोबरी व चार पराभव अशा कामगिरीसह त्यांचे १२ गुण झाले. नॉर्थइस्ट युनायटेडला (८ सामन्यांतून १०) मागे टाकून त्यांनी एक क्रमांक प्रगती करीत सहावे स्थान गाठले. जमशेदपूरला १० सामन्यांत तिसरी हार पत्करावी लागली. तीन विजय आणि चार बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे १३ गुण आणि चौथा क्रमांक कायम राहिला. खाते उघडण्याची शर्यत ओडिशाने जिंकली. २८व्या मिनिटाला गोलकीकवर सँटानाने मध्य क्षेत्रात चेंडूवर ताबा मिळविला. त्याने नंदकुमार शेखरला पास दिला. नंदकुमारने घोडदौड करीत दोन प्रतिस्पर्ध्यांना चकविले, पण चेंडू त्याच्या ताब्यातून गेला. त्यावेळी हालचालींचा अचूक अंदाज घेत सँटानाने आपल्यापाशी चेंडू येताच गोल केला. जमशेदपूरने दहा मिनिटांत बरोबरी साधली. यास पेनल्टी कारणीभूत ठरली. बचाव फळीतील नारायण दास याच्या धसमुसळ्या खेळाचा ओदीशाला फटका बसला. ओडिशाच्या क्षेत्रात चेंडू येताच नारायण त्यावर ताबा मिळवू शकला नाही. जमशेदपूरच्या सुमित पासीने चेंडू ताब्यात घेतला. त्याचवेळी नारायणने त्याला धक्का दिला. त्यामुळे जमशेदपूरला पेनल्टी बहाल करण्यात आली. त्यावर ऐतोर मॉनरॉयने (३८वे मिनिट) गोल केला. त्याचा फटका ओडिशाचा गोलरक्षक फ्रान्सिस्को डोरोन्सोरो याला अडविता आला नाही. ओडिशाने पूर्वार्धातील अखेरच्या मिनिटाला पुन्हा आघाडी घेतली.
नंदकुमारने अप्रतिम पास दिल्यानंतर सँटानाने (४५वे मिनिट) तितकाच सुदर फटका मारला. त्यावेळी जमशेदपूरचा गोलरक्षक सुब्रत पॉल काहीही करू शकला नाही.