पोलिसांच्या ‘ई-चलन’ सुविधेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

0
109

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते गोवा पोलिसांच्या ई- चलन सुविधेचा शुभारंभ काल करण्यात आला आहे. ऍक्सीस बँकेने पोलीस खात्याला या सुविधेसाठी ४०० पीओएस मशीन उपलब्ध केली आहेत. वाहन नियमभंगाची दंड वाहन चालक कार्डाच्या माध्यमातून भरू शकतो. दंड भरण्यासाठी वाहतूक पोलीस कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही.

या ई- चलन व्यवस्थेमुळे पोलिसांच्या कारभारात पारदर्शकता येण्यास मदत होणार आहे. पोलिसांकडून वाहतूक नियमभंग प्रकरणी चलन दिली जातात. बर्‍याच वेळी वाहन चालक या चलनाबाबत संशय व्यक्त करतो. या नवीन पद्धतीमुळे नियमभंग करणार्‍या वाहन चालकाकडून तात्काळ दंडाची रक्कम वसूल करून पावती दिली जाणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते कळंगुट पोलीस स्थानकाला सीएसआर अंतर्गंत एक जीपगाडी प्रदान करण्यात आली. यावेळी बंदर कप्तान मंत्री मायकल लोबो, पोलीस महानिरीक्षक जसपाल सिंग, ऍक्सीस बँकेचे अधिकारी व इतरांची उपस्थिती होती.
राज्यात अमली पदार्थाच्या विरोधात लढ्यात नागरिकांनी सहभाग घेण्यासाठी पुढे आले पाहिजे. नागरिकांनी अमलीपदार्थ व्यवहाराबाबत माहिती असल्यास पोलिसांना द्यावी, असे मंत्री लोबो यांनी सांगितले.

हेल्मेट परिधान न करणार्‍या पर्यटकांना दंड ठोठवावा. परंतु, हेल्मेट परिधान केलेल्या पर्यटकांना वाहतूक पोलिसांनी अडवू नये. वाहनांच्या कागदपत्रांचा विषय असल्यास वाहन मालकाला जबाबदार धरण्याची गरज आहे, असेही मंत्री लोबो यांनी सांगितले.