ब्रॉड इंग्लंड संघात परतेल

0
161

>> माजी गोलंदाज डॅरेन गॉफ याला विश्‍वास

वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्यासाठी यजमान इंग्लंड आपला प्रमुख वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याला संघात स्थान देईल, असा विश्‍वास इंग्लंडकडून ५८ कसोटी व १५९ सामने खेळलेला जलदगती गोलंदाज डॅरेन गॉफ याने व्यक्त केला आहे. मालिकेतील उर्वरित दोन कसोटी सामने १६ जुलै व २४ जुलैपासून मँचेस्टर येथे खेळविण्यात येतील.

एजिस बाऊल साऊथहॅम्पटन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने ब्रॉडच्या अनुभवापेक्षा मार्क वूडच्या वेगाला पसंती दिली होती. परंतु, वूड याला या लढतीत फारसा प्रभाव पाडता आला नव्हता. जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीतही धार दिसली नव्हती.

‘दुसर्‍या कसोटीसाठी ब्रॉड व ख्रिस वोक्स यांना संधी देताना अँडरसन व वूड यांना विश्रांती दिल्यास इंग्लंडचा संघ अधिक समतोल होईल’, असे मत त्याने व्यक्त केले. सलग तीन कसोटी सामने असल्याने तिसर्‍या कसोटीसाठी अँडरसन व वूड यांना पुन्हा संघात घेणे सहज शक्य आहे. आर्चर व वूड सर्वसामान्यपणे एकाच पठडीतले गोलंदाज असल्यामुळे त्यांचा जपून वापर केला पाहिजे, असे गॉफला वाटते. ‘आम्ही वूड याला दक्षिण आफ्रिकेत सातत्याने ताशी ९० मैल वेगाने गोलंदाजी करताना पाहून प्रभावित झालो. याच कारणास्तव त्याला विंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी निवडण्यात आले. परंतु, प्रत्येकवेळी वेगाच्या जोरावर बळी मिळवणे शक्य नसते, असे गॉफ याने शेवटी सांगितले.
फलंदाजी चिंतेचा विषय ः हुसेन
स्टुअर्ट ब्रॉडची अनुपस्थिती किंवा नाणेफेकीनंतर स्टोक्सने घेतलेला प्रथम फलंदाजीचा निर्णय यावर गरजेपेक्षा जास्त विचारमंधन करण्याची आवश्यकता नसून फलंदाजांच्या अपयशामुळेच इंग्लंडला पहिल्या कसोटीत पराभव पत्करावा लागला, हे सत्य नाकारणे अशक्य असल्याचे इंग्लंडचा माजी कर्णधार व समालोचक नासिर हुसेन याने म्हटले आहे.

जोस बटलरची जागा धोक्यात
आगामी दोन कसोटी सामन्यात कामगिरी उंचावण्यात अपयश आल्यास बटलरची संघातील जागा व कसोटी कारकीर्द धोक्यात येऊ शकते, असे गॉफ याने म्हटले आहे. बटलर याला मागील १२ डावांत एकदाही अर्धशतक लगावता आलेले नाही तसेच पहिल्या कसोटीत त्याने जर्मेन ब्लॅकवूड याला यष्ट्यांमागे दिलेले जीवदान इंग्लंडच्या पराभवातील प्रमुख कारणही ठरले होते. गॉफ याने ज्यो डेन्ली याच्या संघातील जागेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत डेव्हिड मलान, निक कॉम्पटन किंवा किटन जेनिंग्स यांना संधी देण्याची वेळ आली असल्याचे सांगितले.