‘ब्रिक्स’ सुरक्षा सल्लागार अधिवेशन आज दिल्लीत

0
103

>> सुरक्षा विषयक समन्वय मजबुतीचे चीनचे आवाहन

 

‘ब्रिक्स’च्या सदस्य देशांनी सुरक्षेच्या मुद्यासंदर्भातील समन्वय अधिक मजबूत करावा व आंतरराष्ट्रीय व्यवहारांबाबत महत्वाची भूमिका बजावावी असे आवाहन चीनने केले आहे. चीनसह पाच देशांच्या ‘ब्रिक्स’ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचे अधिवेशन आज दिल्लीत होणार असून त्या पार्श्‍वभूमीवर चीनने हे आवाहन केले आहे.
‘ब्रिक्स’ (ब्राझील, रशिया, भारत, चीन व दक्षिण आफ्रिका) आंतरराष्ट्रीय विषयांवर मोठी भूमिका बजावीत आहे आणि ‘ब्रिक्स’मधील देश समन्वय व विकास आणि सुरक्षेच्या बाबींवर समन्वय आणू शकतात. तसेच शांती, समृध्दी व स्थिरता यांच्यासाठी योगदान देऊ शकतात अशी आम्हाला आशा आहे, असे निवेदन चीनी परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्या हुआ चूनयिंग यांनी केले आहे.
नवी दिल्लीत आज होणार्‍या ‘ब्रिक्स’ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अधिवेशनात चीनतर्फे यांग जिएची हे प्रतिनिधीत्व करणार असल्याचे चूनयिंग यांनी सांगितले. तथापि, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल व चीनी प्रतिनिधी यांग यांच्यातील द्विपक्षीय बैठकीविषयी आपल्याला माहिती नसल्याचे चूनयिंग यांनी स्पष्ट केले. डोवल व यांग हे भारत-चीन सीमाविषयक बोलण्यांसाठीही उभय देशांचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.
आजच्या अधिवेशनाच्या विषय पत्रिकेत दहशतवाद विरोध, ऊर्जा सुरक्षा, सायबर सुुरक्षा, पश्‍चिम आशियातील स्थिती तसेच अन्य आंतरराष्ट्रीय बाबींचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले. सहभागी प्रतिनिधी या विषयांवर तपशीलवार चर्चा करणार असल्याचे त्या म्हणाल्या. गोव्यात ऑक्टोबरमध्ये होणार्‍या ‘ब्रिक्स’ शिखर परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर दिल्लीत वरील अधिवेशन होत आहे.