‘ब्रिक्स’च्या पर्यावरणमंत्र्यांची शुक्रवारी गोव्यात बैठक

0
50

‘ब्रिक्स’ समुहातील राष्ट्रांच्या पर्यावरणमंत्र्यांची शुक्रवार, १६ सप्टेंबर रोजी गोव्यात बैठक आहे. परस्पर सहकार्य वृद्धींगत करणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश आहे. बैठकीचे यजमानपद भारताकडे असल्यामुळे केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामानबदल खात्याचे राज्यमंत्री (स्वंतत्र प्रभार) अनिल माधव दवे आज गोव्यात येत आहेत.

पर्यावरणासंदर्भातील परस्पर सामंजस्य करार आणि संयुक्त कार्यगट यावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. ‘ब्रिक्स’ समुहातील राष्ट्रांचे पर्यावरणमंत्री वायू प्रदुषण, जल प्रदुषण, घन आणि तरल कचरा व्यवस्थापन, हवामानबदल, जैवविविधतेचे संरक्षण यासारख्या गंभीर मुद्यांवर परस्पर सहकार्याने कृती करण्यावर भर देण्याचा प्रयत्न या बैठकीत केला जाण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर अधिकारी स्तरावरील चर्चा होणार आहे.
पर्यावरणमंत्र्यांची ही बैठक अतिशय महत्त्वाची मानली जाते. कारण, विकासासाठीच्या आर्थिक सहकार्यासाठी अदिस अबाबा कृती विषयपत्रिका, शाश्वत विकास ध्येय आणि गेल्या वर्षी झालेला पॅरीस करार यानंतर ही बैठक होत आहे. ऑक्टोबर २०१६ मध्ये गोव्यात ‘ब्रिक्स’ राष्ट्रप्रमुखांची बैठक होत आहे, त्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या अनेक स्तरावरील बैठकांपैकी ही बैठक आहे. केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामानबदल खात्याने या बैठकीचे आयोजन केले आहे.
ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आङ्ग्रिका या ‘ब्रिक्स’ समुहातील राष्ट्रांचा जागतिक लोकसंख्येत वाटा ४१.६ टक्के, जागतिक भूभागाच्या २९.३१ टक्के भूभाग व्यापला आहे आणि जागतिक जीडीपीमध्ये २२ टक्के वाटा आहे.