‘आप’चे चार उमेदवार जाहीर

0
86

आम आदमी पार्टीने येत्या विधानसभा निवडणुकीसाठी काल पणजी, शिरोडा, मयें व वेळ्ळी या चार मतदारसंघासाठीचे आपले उमेदवार जाहीर केले.

पणजी मतदारसंघासाठी वाल्मिकी नाईक, मयें मतदारसंघासाठी ऍड. अजितसिंह राणे, शिरोडा मतदारसंघासाठी मोलू वेळीप तर वेळ्‌ळी मतदारसंघासाठी क्रूझ सिल्वा यांना उमेदवारी देण्यात आली असल्याचे डॉ. ऑस्कर रिबेलो व सुरेल तिळवे यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
या उमेदवारांची निवड करण्यापूर्वी त्यांच्यावर भ्रष्टाचार, गुन्हेगारी व जातीय वादाचे आरोप नसल्याची खात्री पक्षाने करून घेतली असल्याचे रिबेलो व तिळवे यांनी सांगितले.
ऍड. अजितसिंह राणे हे पूर्वी कॉंग्रेसमध्ये होते. नंतर तेथून ते शिवसेनेत गेलेे व शिवसेनेतून आम आदमी पार्टीत आले हे डॉ. रिबेलो यांनी मान्य केले. राणे हे आम आदमीला त्यांचे हक्क मिळावेत यासाठी भांडत असतात व आम आदमी पार्टीच सर्वसामान्यांना न्याय देऊ शकते हे कळून चुकल्यानेच राणे हे आम आदमी पार्टीत आले असल्याचे डॉ. रिबेलो म्हणाले.
शिरोडा मतदारसंघासाठी उमेदवारी देण्यात आलेले मोलू वेळीप हे तळागाळातील कार्यकर्ते असून त्यांनी आम आदमी पार्टीसाठी कार्य करण्यास कार्यकर्त्यांची एक फळी उभारली असल्याचे त्यानी नमूद केले. क्रूझ सिल्वा हे वेळ्ळीचे माजी सरपंच असून मच्छिमारांचे नेते असल्याचे सांगून स्थानिक स्वयंसेवकांकडून आलेल्या नावांची छाननी समितीने योग्य प्रकारे पाहणी केली व नंतर ती नावे पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात आली होती. सदर समितीने या चारही नावांना मान्यता दिली असल्याचे ते म्हणाले.
टप्प्या टप्प्याने उमेदवारांची नावे घोषित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.