Home Featured बेभान हल्ले

बेभान हल्ले

0

चार दिवसांत इराणमध्ये सत्तांतर घडवून आणू अशा गमजा मारत युद्ध पुकारलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना इराणने पुरते कोंडीत पकडले आहे. युद्ध तडीलाही नेता येत नाही आणि मागे हटताही येत नाही अशा पेचात अमेरिका सध्या सापडलेली दिसते. इस्रायलने मात्र आपले हिशेब पूर्ण करून घेतले आहेत. इस्रायलने इराणचे सर्वेसर्वा खामेनेई यांचा पहिल्याच दिवशी खात्मा केला. त्यानंतर इराणच्या एकेका बड्या नेत्याच्या हत्यांचे सत्र सुरू आहे. अमेरिकेने इराणचे नौदल बुडवून टाकले, हवाई दल नाकाम केले, हजारो ठिकाणांवर भयावह क्षेपणास्त्र हल्ले चढवले, परंतु तरीही इराण मात्र निकराने लढतो आहे. आपल्या स्वस्तातल्या द्रोनपासून अत्याधुनिक क्षेपणास्त्रांपर्यंत नानाविध आयुधांचा वापर करून इराणने सर्वशक्तीनिशी इस्रायल व अमेरिकेचा प्रतिकार चालवला आहे. नुकतेच त्याने अमेरिकेचे सर्वांत अत्याधुनिक मानले जाणारे एफ 35 विमान पाडून दाखवले. केवळ इस्रायलपुरते आपले प्रत्युत्तर त्याने सीमित ठेवलेले नाही. आखाती देशांमधील अमेरिकी तळांवर हल्ले चढवून युद्धाची व्याप्ती त्याने विस्तारली. पुढे हे हल्ले नागरी वस्त्यांवर सुरू झाले. आता हे युद्ध त्याहून धोकादायक पातळीवर पोहोचले आहे, कारण जागतिक अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या तेल व नैसर्गिक वायूच्या साठ्यांवर दोन्ही बाजूंनी बेबंद हल्ले चढवले जाताना दिसत आहेत. वर्षानुवर्षाची मानवी गरज भागवण्याएवढ्या ह्या जैवइंधनाचा असा कोळसा करणाऱ्या ह्या युद्धखोर राष्ट्रांनी स्वतःची कबर तर खोदायला घेतली आहेच, शिवाय ह्या युद्धाशी संबंध नसलेल्या देशांनाही संकटाच्या खाईत लोटले आहे. भारतापर्यंत त्याची झळ अपरिहार्यपणे येऊन पोहोचली आहे. काल पेट्रोलच्या दरांत थोडी वाढ झाली. एलपीजी पुरवठा आता काही जहाजे येऊन पोहोचल्याने पूर्ववत झालेला असला, तरी युद्ध लांबले तर तो पुन्हा बाधित होऊ शकतो. इस्त्रायल असो, अमेरिका असो अथवा इराण असो, जेव्हा तेलविहिरी, तेलशुद्धिकरण प्रकल्प आणि तेलवाहू जहाजे ह्या युद्धाच्या कचाट्यात आली, तेव्हाच जगापुढे काय वाढून ठेवले आहे त्याचा अंदाज यायला सुरुवात झाली होती. इस्रायलने इराणच्या तेलसाठ्यांना लक्ष्य केले. इराणने आपल्यावरील हल्ल्यांचे प्रत्युत्तर आखातातील विविध देशांच्या तेलशुद्धिकरण प्रकल्पांवर हल्ले चढवून दिले. हे आता ठोशास ठोसा पातळीवर उतरले आहे. इस्रायलने जगातील सर्वांत मोठा इंधन साठा असलेल्या साऊथ पार्स भागावर हल्ला चढवला. त्याचे उत्तर इराणनने कतारच्या रास लाफानवर हल्ला चढवून दिले आहे. इराणच्या खार्ग बेटावर आक्रमणाची तयारी अमेरिकेने आता चालवली आहे आणि आपली युद्धनौका रवाना केली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तेलवाहतुकीवर तर हल्ले सुरूच आहेत. वीसपेक्षा अधिक जहाजांना इराणने हल्ले चढवून आगीच्या हवाली केले. जहाजांना पलीकडे जाऊ देण्यासाठी लाखोंचे शुल्क आकारले जात असल्याच्या बातम्या आहेत. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तेलवाहतूक सुरळीत करण्यासाठी अमेरिकेने आपल्या सर्वांत शक्तिशाली बंकरबस्टर बॉम्बचे हल्ले चढवले. परंतु एवढे सगळे होऊनही अजूनही इराणचा प्रतिकार थंडावलेला दिसत नाही. जसजसे दिवस जात आहेत, तसतसे हे युद्ध अधिकाधिक धोक्याच्या पातळीकडे चाललेले दिसते आहे. तेल आणि नैसर्गिक वायूसारख्या संसाधनांवर ह्या युद्धात जे भीषण हल्ले चढवले जात आहेत, ज्या प्रकारे आगीचे लोळ उठत आहेत, ते केवळ त्या देशांचे नुकसान नव्हे. ते अखिल मानवजातीचे नुकसान आहे. परंतु एवढे शहाणपण ह्या युद्धखोरांना उरलेले दिसत नाही. कतारच्या तेलप्रकल्पावर झालेल्या हल्ल्यामुळे जगभराचा एलएनजीचा पुरवठा पाच वर्षे बाधित होईल असे त्या देशाने जाहीर केेले आहे, ते खरेच आहे. युद्धाची ही किंमत जागतिक अर्थव्यवस्थेला मोजावी लागेल याचे भान ह्या देशांना उरलेले दिसत नाही. अमेरिका आपली प्रतिष्ठा सांभाळण्याच्या प्रयत्नात आहे. इस्रायल आपले हिशेब पूर्ण करतो आहे. इराण ‘मी मरेन, पण तुला रंडकी करेन’ म्हणतात तसे अवघ्या आखातालाच ओलीस धरू पाहतो आहे. या परिस्थितीत समेटासाठी आणि शांतता प्रस्थापनेसाठी इतर देशांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. परंतु दुर्दैवाने महासत्ता अमेरिकेची इतराजी ओढवून घेण्याची भारतासह कोणाची तयारी दिसत नाही. श्रीलंकेसारख्या छोट्या देशाने चीनच्या पाठबळावर का होईना, अमेरिकेला आपला विमानतळ वापरण्यास नकार देण्याची, इराणच्या जहाजाला आसरा देण्याची हिंमत दाखवली. भारताने आता तेलसाठ्यांवरील हल्ल्यांसंदर्भात आखाती देशांशी संवाद सुरू केला आहे ही आश्वासक बाब आहे. बेभान हल्ले चढवणाऱ्यांना भानावर आणण्यासाठी कोणीतरी पुढे व्हावेच लागेल.