नियमित आरोग्य तपासण्या केल्या; अहवाल सामान्य; रुबी इस्पितळाकडून दुजोरा; आज किंवा उद्यापर्यंत राज्यात दाखल होणार
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर पुणे येथील रुबी या खासगी इस्पितळात अँजियोप्लास्टी करण्यात आल्याची ब्रेकिंग न्यूज काल सकाळी एका वृत्तपत्राने दिल्यानंतर ते वृत्त वायरल झाले; मात्र नंतर ज्या रुबी ह्या खासगी इस्पितळात मुख्यमंत्र्यांनी उपचार घेतले होते, त्या इस्पितळाने त्या वृत्ताचे खंडन करताना ‘रुटीन चेकअप’ म्हणजेच नियमितपणे केल्या जाणाऱ्या तपासण्या करण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे इस्पितळात आले होते आणि त्यांच्या सगळया तपासण्या सामान्य असून, चिंता करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे स्पष्ट केले. तसेच मुख्यमंत्र्यांनी देखील सगळ्या तपासण्यांचा अहवाल सामान्य असल्याचे काल स्पष्ट केले. दरम्यान, मुख्यमंत्री आज किंवा उद्या गोव्यात परतणार आहेत.
एका वृत्तपत्राने मुख्यमंत्र्यांवर अँजिओप्लास्टी झाल्याची ब्रेकिंग न्यूज प्रसारित केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. अनेकांनी फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
या सर्व अफवांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला. त्यात सध्या आपण आपल्या कुटुंबीयांबरोबर पुण्यात असून, शनिवारी गोव्यात येऊन कामकाज सांभाळणार असल्याचे स्पष्ट केले. आपल्या ज्या हितचिंतकांनी आरोग्याविषयी विचारपूस केली, त्यांचा आपण आभारी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या आरोग्याविषयी माहिती देताना रुबी हॉल क्लिनिकचे अध्यक्ष डॉ. परवेझ ग्रांट म्हणाले की, प्रमोद सावंत हे नियमित आरोग्य तपासणीसाठी इस्पितळात दाखल झाले होते. त्यांनी विविध वैद्यकीय चाचण्या करून घेतल्या. या सर्व तपासण्यांचे अहवाल सामान्य आल्याने त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही चिंता नाही.
प्रदेशाध्यक्ष दामू नाईक
काय म्हणाले?
याविषयी गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांना विचारले असता, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर अँजिओप्लास्टी झालेली नसून, आपण दूरध्वनीवरून मुख्यमंत्र्यांशी बोललो असल्याचे स्पष्ट केले.
जलजीवन मिशनच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचा सहभाग
पेयजल व स्वच्छता विभाग, जलशक्ती मंत्रालय, भारत सरकार आणि गोवा सरकार यांच्यात ‘जलजीवन मिशन 2.0′ अंतर्गत सामंजस्य करार स्वाक्षरी कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे आभासी माध्यमातून सहभागी झाले. या कार्यक्रमास केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील, राज्याचे पेयजल व समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
गोव्याने पहिल्या टप्प्यात 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण करत प्रत्येक ग्रामीण घरापर्यंत नळाद्वारे पाणीपुरवठा सुनिश्चित केला आहे. या मजबूत पायावर आधारित, आता जलजीवन मिशन 2.0 अंतर्गत सेवा वितरण बळकट करणे, टिकाव आणि दीर्घकालीन कार्यक्षमतेवर भर दिला जाईल. या सामंजस्य करारात डिजिटल प्लॅटफॉर्म, डॅशबोर्ड, जिओ-टॅगिंग आणि रिअल-टाइम डेटा समाकलनाद्वारे प्रगत निरीक्षण प्रणाली पारदर्शकता, कार्यक्षमता आणि जलसेवा व्यवस्थापन वाढवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब, मानवी संसाधनांचे क्षमतावर्धन व प्रशिक्षण, गावपातळीवरील पाणी व्यवस्थापन या बाबींवर विशेष भर देण्यात आला आहे.
जलजीवन मिशन 2028 पर्यंत वाढवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. त्यामुळे गोव्यासारख्या राज्यांना मिळालेल्या यशाची अधिक मजबुती करता येईल आणि प्रत्येक घरासाठी शाश्वत जलसुरक्षा सुनिश्चित करता येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले.