बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा सुरत ते बिलिमोरा असा असणार असून, बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा 15 ऑगस्ट 2027 रोजी प्रवाशांच्या सेवेत येईल, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल दिली. यानंतर वापी ते सुरत हा टप्पा सुरू करण्यात येणार आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यावर वापी ते अहमदाबाद मार्ग सुरू होईल. हे सगळे मार्ग प्रवासी सेवेत आल्यावर ठाणे ते अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन धावेल. सगळ्यात शेवटी मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू होईल, असे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.
बुलेट ट्रेनमुळे मुंबईहून अहमदाबाद हे अंतर केवळ 2 तास 7 मिनिटांत कापता येणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दर 30 मिनिटांनी ट्रेन पकडता येणार आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी बीकेसी आणि शिळफाटादरम्यानच्या 21 किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्यात येत आहे. या बोगद्यापैकी 5 किलोमीटर लांबीचा बोगदा शिळफाटा आणि घणसोलीदरम्यान न्यू ऑस्ट्रियन टनलिंग मेथड (एनएटीएम) वापरून बांधला जात आहे, तर उर्वरित 16 किलोमीटर लांबीचा बोगदा टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) वापरून बांधला जात आहे. या बोगद्यात ठाणे खाडीखालील 7 किलोमीटर लांबीच्या भागाचाही समावेश आहे. या बुलेट ट्रेनमुळे मुंबई-अहमदाबादमधील व्यापार, गुंतवणूक व पर्यटनाला चालना मिळणार आहे.
दरम्यान, या प्रकल्पात जपानचे शिंकान्सेन हाय-स्पीड ट्रेन तंत्रज्ञान वापरले जात आहे. या मार्गावर एकूण 12 स्टेशन्स असून, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील मुंबई बुलेट ट्रेन स्टेशन हे मुंबई-अहमदाबाद एचएसआर कॉरिडॉरवरील एकमेव भूमिगत स्टेशन आहे. यासाठी जमिनीखाली 32.50 मीटर (अंदाजे 106 फूट) खोलीपर्यंत खोदकाम केले जात असून, या स्टेशनमध्ये प्लॅटफॉर्म, कॉन्कोर्स आणि सर्व्हिस फ्लोअरसह तीन मजले असतील. या मार्गावरील सर्व स्थानकांवर सहा प्लॅटफॉर्म असतील. स्टेशन मेट्रो लाईन्स आणि रोडवेजशी जोडली जाईल. स्टेशनवर येणाऱ्या प्रवाशांना सर्व सुविधा उपलब्ध असतील.
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन
गुवाहाटी-कोलकाता दरम्यान
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन गुवाहाटी ते कोलकाता दरम्यान चालवली जाणार आहे. थर्ड एसीचे भाडे 2,300 निश्चित करण्यात आले आहे, तर सेकंड एसीचे भाडे 3,000 असेल. फर्स्ट एसीचे भाडे अंदाजे 3,600 प्रस्तावित करण्यात आले आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनची चाचणी (ट्रायल), तपासणी (टेस्टिंग) आणि प्रमाणीकरण (सर्टिफिकेशन) पूर्ण झाले आहे, असे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी सांगितले. या वर्षाच्या अखेरपर्यंत अंदाजे 12 वंदे भारत स्लीपर ट्रेन तयार होतील.