Home बातम्या इलेक्टोरल ट्रस्टकडून भाजपला सर्वाधिक 3,112 कोटी रुपयांचा निधी

इलेक्टोरल ट्रस्टकडून भाजपला सर्वाधिक 3,112 कोटी रुपयांचा निधी

0

इतर पक्षांना मिळाले फक्त 400 कोटी; निवडणूक आयोगाला सादर अहवालातून उघड

इलेक्टोरल बॉन्डवरील सर्वोच्च न्यायालयाच्या बंदीनंतर, पहिल्या आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये राजकीय पक्षांना नऊ इलेक्टोरल ट्रस्टद्वारे 3,811 कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. यापैकी 3,112 कोटी रुपये केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला मिळाले आहेत. हे प्रमाण एकूण निधीच्या सुमारे 82 टक्के एवढे आहे.
ही माहिती इलेक्टोरल ट्रस्ट्सनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या अहवालातून समोर आली आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर अपलोड केलेल्या या अहवालानुसार, इतर सर्व पक्षांना मिळून सुमारे 400 कोटी (10 टक्के) निधी मिळाला. यामध्ये काँग्रेसला 299 कोटी मिळाले, जे एकूण देणगीच्या 8 टक्क्यांपेक्षाही कमी आहे.

इलेक्टोरल ट्रस्ट ही एक नोंदणीकृत संस्था असते, जी कॉर्पोरेट कंपन्या आणि व्यक्तींकडून देणग्या घेऊन राजकीय पक्षांपर्यंत पोहोचवते. ट्रस्टला देणग्यांची संपूर्ण माहिती निवडणूक आयोगाला द्यावी लागते. त्यामुळे देणग्यांचा रेकॉर्ड राहतो आणि कोणत्या पक्षाला किती देणगी मिळाली हे कळते.
20 डिसेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार, निवडणूक आयोगाकडे 19 पैकी 13 इलेक्टोरल ट्रस्ट्सचे अहवाल उपलब्ध होते. यापैकी 9 ट्रस्ट्सनी 2024-25 मध्ये एकूण 3,811 कोटी देणगी दिली, जी 2023-24 च्या 1,218 कोटींच्या तुलनेत 200 टक्क्यांपेक्षा जास्त आणि तिप्पट आहे. दरम्यान, गेल्या आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये भाजपला एकूण 3,967.14 कोटी देणग्या मिळाल्या होत्या. यापैकी 43 टक्के म्हणजे 1,685.62 कोटी इलेक्टोरल बॉन्डद्वारे आले होते. 2018 मध्ये सुरू झालेले इलेक्टोरल बॉन्ड सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारी 2024 मध्ये पारदर्शकतेच्या अभावामुळे अवैध ठरवून बंद केले होते. त्यानंतर राजकीय निधीमध्ये मोठा बदल झाला आणि इलेक्टोरल ट्रस्ट पक्षांसाठी देणगीचे मुख्य माध्यम बनले आहेत.

प्रुडेंट इलेक्टोरल ट्रस्टकडून भाजपला सर्वाधिक देणगी

भाजपला देणगी देण्याच्या बाबतीत प्रुडेंट इलेक्टोरल ट्रस्ट सर्वात पुढे होता. भाजपला एकूण 3,112 कोटींपैकी 2,180.07 कोटी एकट्या प्रुडेंटने दिले. प्रुडेंटने काँग्रेसला 21.63 कोटी देणगी दिली आहे. प्रुडंट इलेक्टोरल ट्रस्टने तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष, टीडीपीसह अनेक पक्षांनाही देणग्या दिल्या. मात्र, त्यांच्या एकूण 2,668 कोटींच्या देणग्यांपैकी सुमारे 82 टक्के रक्कम भाजपला मिळाली. ट्रस्टला ज्या कंपन्यांकडून निधी मिळाला, त्यामध्ये जिंदल स्टील अँड पॉवर, मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, भारती एअरटेल, ऑरोबिंदो फार्मा आणि टॉरंट फार्मास्युटिकल्स यांचा समावेश आहे.

प्रोग्रेसिव्ह इलेक्टोरल ट्रस्ट दुसऱ्या क्रमांकावर

पक्षांना सर्वाधिक देणग्या देण्याच्या बाबतीत प्रोग्रेसिव्ह इलेक्टोरल ट्रस्ट दुसऱ्या क्रमांकावर होता, ज्याने एकूण 914.97 कोटी दान केले, त्यापैकी 757.62 कोटी भाजपला आणि 77.34 कोटी काँग्रेसला दिले.