राज्य सरकारच्या समाजकल्याण खात्याने मुख्यमंत्री देवदर्शन योजनेत दुरुस्ती केली असून, आता 50 ते 70 वर्षे वयोगटातील नागरिकांना या योजनेचा लाभ घेणे शक्य होणार आहे.
समाजकल्याण खात्याचे संचालक दीपक देसाई यांनी यासंबंधीची दुरुस्ती सूचना जारी केली आहे. यापूर्वी 60 वर्षांवरील नागरिकांसाठी ही योजना खुली होती. समाजकल्याण खात्याने एका एजन्सीसोबत केलेल्या सामंजस्य करारानुसार एजन्सी पॅकेज अंतर्गत नागरिकांना देवदर्शनासाठी पाठविले जातात. या देवदर्शन यात्रेसाठी किमान 750 नागरिकांची नोंदणी होणे गरजेचे आहे.
या योजनेचा लाभ घेऊन इच्छिणाऱ्या नागरिकांना आरोग्य प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आले आहे. एका मदतनिसाला अर्जदारासोबत मोफत जाण्यास मान्यता दिली जाणार आहे. या योजनेसाठी समाजकल्याण खात्याने तयार केलेल्या वेबपोर्टल किंवा ॲपवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. खात्याला देवदर्शन योजनेंतर्गत मिळणारे अर्ज मंजुरीसाठी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवून निर्णय घेतला जाणार आहे, असे सूचनेत म्हटले आहे.