बिहारात सत्तापालट?

0
277

बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या लागेल. यच्चयावत मतदानोत्तर पाहण्यांनी यावेळी बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे तरुण नेते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली महागठबंधनचे सरकार बनेल असे भाकीत केलेले आहे. महागठबंधनला १२० ते १८० जागा आणि जेडीयू – भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ५५ ते ११६ जागा असे अनुमान या पाहण्यांत काढण्यात आले आहे. मतदानोत्तर पाहण्यांचे निष्कर्ष नेहमीच बरोबर येतात असे नाही. बिहारमध्येच यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ते सपशेल खोटे ठरलेले होते. पण यावेळी खरोखरच बिहारचे निकाल तसे लागले तर मुख्यमंत्री नितीशकुमार आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी तो ङ्गार मोठा झटका ठरेल. नितीशकुमार यांच्या सत्तेला तर तो हादरा असेलच, शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोरोना कालखंडातील कामगिरीचे मोजमाप म्हणूनही या निकालाकडे पाहिले जात असल्याने भारतीय जनता पक्षासाठीही बिहारचा निकाल ही प्रतिष्ठेची बाब बनलेली आहे.
नितीशकुमार यांच्या लोकप्रियतेला ओहटी का लागली हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. ज्या लालूप्रसाद यादवांच्या जंगलराजचा नायनाट करीत नितीशकुमार यांनी विकासाचे राजकारण केले, त्यांच्यावर जर लालूपुत्राकडूनच सत्ताभ्रष्ट होण्याची वेळ येणार असेल तर हे का घडले हा विषय निश्‍चितच कुतूहलाचा ठरेल. सत्तेवर असलेल्या नितीशकुमार यांना यावेळी अँटी इन्कम्बन्सीला सामोरे जावे लागले हे तर उघड आहेच, परंतु केवळ तेवढ्याने या पराभवाची मीमांसा करणे वा पराभवाचे खापर त्यांच्या एकट्यावर ङ्गोडणे पुरेसे ठरणार नाही. या पराभवामध्ये भाजपही वाटेकरी असेल.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर दलित नेते चिराग पास्वान नितीशकुमारांशी संघर्ष करीत आपल्या लोकजनशक्ती पक्षाला रालोआबाहेर काढले. बिहारसारख्या जातीपातींच्या राजकारणाने लडबडलेल्या या निवडणुकीमध्ये पासवान यांच्या जेडीयू – भाजपपासून दूर जाण्याने दलित – मागास – अतिमागासांमध्ये जो संदेश गेला, तो राष्ट्रीय लोकशाही आघाडीला जड गेला असाही वरील निकालाचा अर्थ असेल.
जेडीयूला पाठबळ देणार्‍या भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील सरकारने कोरोनामुळे केलेल्या लॉकडाऊनचा सर्वाधिक ङ्गटका ज्या स्थलांतरित मजुरांना बसला तेही मतदानयंत्रातून वचपा काढणार का हे पाहणेही औत्सुक्याचे आहे. रोजगाराचा जो ङ्गार मोठा प्रश्न आज देशात निर्माण झालेला आहे, त्याला तेजस्वी यांनी आपल्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनविले होते हे येथे उल्लेखनीय आहे. याउलट भारतीय जनता पक्ष – अगदी पंतप्रधान मोदी देखील राममंदिर, पुलवामा अशा भावनिक विषयांमध्येच मतदारांना गुंगवताना दिसले.
तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दलाकडे आज बिहारची जनता पर्याय म्हणून पाहते आहे असे या मतदानोत्तर पाहण्यांचे निकाल सुचवित आहेत. या निवडणुकीमध्ये तेजस्वी यांनी बिहार जवळजवळ ढवळून काढला. तब्बल अडीचशे प्रचारसभांना त्यांनी संबोधित केले. दिवसाला सरासरी पंधरा – वीस सभांचा धडाका त्यांनी लावला. या मंथनातून सत्तेचा अमृतकुंभ त्यांच्या हाती लागेल असा अंदाज एकमताने सर्वत्र वर्तवला जाताना दिसतो आहे. राजदसाठी हे मोठे पुनरागमन ठरेल. वडील लालूप्रसाद, आई राबडीदेवींनतर मुलगा तेजस्वीही मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीत बसणार असेल तर व्यक्तिगत पातळीवरही तो एक विक्रम ठरेल. लालूप्रसाद यांच्यासारखी तेजस्वी यांची छबी भ्रष्ट नाही. उलट आजच्या तरुणांचा आवाज बनून त्यांच्या जिव्हाळ्याचे मुद्देच ते उठवीत आले आहेत. पंतप्रधान मोदींनी भले त्यांना जंगलराजका युवराज म्हणून हिणवले असले तरी बिहारसारख्या राज्यात जिथे जवळजवळ साठ टक्के लोकसंख्या ही तरुणांची आहे, तिथे तेजस्वी यांच्या तेजाची भुरळ तरुणाईला पडली तर आश्चर्य वाटू नये. नितीशकुमार यांची छबी अलीकडच्या काळात मलीन झाली आहे. जाहीर सभेमध्ये त्यांच्यावर कांदे ङ्गेकण्यापर्यंत मतदारांची मजल गेलेली या निवडणुकीत दिसली. नितीश यांनाही पराभवाची चाहुल लागली असावी, कारण आपल्या अखेरच्या प्रचारसभेत ही आपली शेवटची निवडणूक असल्याची भावनिक साद त्यांनी घातली. आपल्या अखेरच्या निवडणुकीत ते सत्ता गमावणार की राखणार हे उद्या दिसेलच.