अमेरिका स्थापणार कोरोना टास्क फोर्स

0
262

>> राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांची घोषणा

राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी शनिवारी रात्री डेलावेयरच्या विलमिंगटनमध्ये आम्ही कोविड संदर्भातील योजनांच्या मदतीसाठी आणि २० जानेवारी २०२१ पासून याच्या अंमलबजावणीसाठी कोरोना टास्क फोर्स स्थापन करण्याची घोषणा केली. या गटामध्ये आघाडीच्या वैज्ञानिक आणि विशेषज्ञांचा समावेश असेल असे त्यांनी सांगितले. मात्र या गटाचे नेतृत्व कोण करेल हे त्यांनी जाहीर केले नाही.

टास्क फोर्स काही दिवसांत बैठकांना सुरुवात करणार आहे. या गटाचे सहअध्यक्ष म्हणून भारतीय वंशाचे डॉक्टर विवेक मूर्ती हे करणार असल्याचा अंदाज तेथील तज्ज्ञांनी वर्तवला आहे. निवडणूक प्रचारादरम्यान डॉ. मूर्ती सार्वजनिक आरोग्य आणि कोरोना विषाणूच्या मुद्द्यांवर बायडन यांचे सर्वोच्च सल्लागारांपैकी एक सल्लागार म्हणून पुढे आले होते.

माझा विजय निर्भेळ
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी जो बायडन विराजमान होणार हे शनिवारी रात्रीच स्पष्ट झाले होते. त्यामुळे बहुमत मिळवल्यानंतर ज्यो बायडन यांनी पहिल्यांदाच अमेरिकेच्या जनतेला संबोधित केलेे.
यावेळी बायडन म्हणाले की, अमेरिकेच्या जनतेने मला विजयी केले आहे. अमेरिकेच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्राध्यक्षपदासाठी भरघोस मतदान झाले. त्यामुळे आपला विजय हा निर्भेळ आहे. मी अमेरिकेचा अध्यक्ष या नात्याने तुम्हा सगळ्यांना सांगू इच्छितो की मी विभाजनाचे राजकारण करणार नाही. एकात्मतेसाठी प्रयत्न करेन. मला एकसंध अमेरिकाच दिसत असल्याचे बायडन म्हणाले.

यावेळी त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांना आवाहन केले. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ज्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना मते दिली होती त्यांची निराशा झाली असेल मात्र आता एकमेकांना संधी देऊया. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणे थांबवूया. आपण एकमेकांनी नव्या दृष्टीकोनातून एकमेकांकडे पाहूया असे आवाहन केले.

दरम्यान, मतमोजणीनंतर जो बायडन विजयी झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी पुन्हा एकदा मतमोजणी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

कमला हॅरिस यांनी रचला इतिहास
भारतीय वंशाच्या कमला हैरिस या इतिहास रचत अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. त्यामुळे भारतासाठी ही अभिमानाची बाब आहे.