बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा राजीनामा

0
87

>> भाजपच्या पाठिंब्यावर आज पुन्हा होणार मुख्यमंत्री

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काल संध्याकाळी राज्यपाल के. एन. त्रिपाठी यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला असून त्यांच्या या अनपेक्षित निर्णयामुळे राष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नितीश यांच्या या निर्णयाचे अभिनंदन केले असून भाजपमध्ये येण्याची ऑफर देत भ्रष्टाचाराशी आपण एकत्र लढू असे म्हटले आहे. दरम्यान, भाजपने संयुक्त जनता दलाला सरकार स्थापनेसाठी बिनशर्त पाठिंबा दिला असून आज जदयू-भाजप आघाडीचे सरकार स्थापन करण्याचा निर्णय रात्री उशिरा झाला.
काल संध्याकाळी संयुक्त जनता दलाच्या आमदारांसोबत झालेल्या बैठकीत नितीश यांनी मुख्यमंत्रिपद सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सदरचा निर्णय जदयूच्या आमदारांना सांगितल्यानंतर सर्व आमदारांनी त्यांच्या निर्णयाला पाठिंबा दर्शविला. त्यानंतर संध्याकाळी राजभवनात जाऊन नितीश कुमार यांनी राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. पत्रकारांशी बोलताना नितीश कुमार म्हणाले की, गेल्या २० महिन्यांत बिहारमध्ये महायुती सरकारने अनेक कल्याणकारी योजना राबविल्या. लालू यादव आणि कॉंग्रेसशी परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी चर्चा केली, मात्र काहीही तोडगा निघाला नाही. गेल्या काही दिवसांपासूनची जी परिस्थिती आहे, त्यात आरोप असलेल्या मंत्र्यांसोबत काम करणे अशक्य आहे. बिहारच्या हितासाठी आपण काहीही करायला तयार असल्याचे नितिशकुमार म्हणाले. यावेळी त्यांनी नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन केले. गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते लालू प्रसाद यादव व त्यांचे पुत्र बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. त्यानंतर तेजस्वी यादव यांचा उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात यावा म्हणून नितीश कुमार यांच्यावरील दबाव सातत्याने वाढत होता. मात्र, तेजस्वी यादव कोणत्याही परिस्थितीत राजीनामा देणार नाहीत, अशी भूमिका लालू प्रसाद यादव यांनी घेतली होती. कालदेखील लालू प्रसाद यादव यांनी नितीश कुमार यांनी तेजस्वी यांचा राजीनामा मागितलाच नसल्याचे म्हटले होते. मात्र, त्यानंतर नितीश कुमार यांनी सरळ मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत सर्वांनाच धक्का दिला आहे.

बिहारातील पक्षीय बलाबल
एकूण २४३ सदस्य
राष्ट्रीय जनता दल (राजद)         ८०
जनता दल युनायटेड (जदयू)    ७१
कॉंग्रेस                                     २७
भाजप (विरोधी पक्ष)                ५३
सीपीआय                                   ३
लोक जनशक्ती पार्टी                    २
राष्ट्रीय लोक समता पार्टी             २
हिंदुस्थानी अवाम मोर्चा              १
अपक्ष                                        ४