अपघात रोखण्यासाठी दंडात पाचपट वाढ

0
139

>> वाहतूकमंत्र्यांची माहिती
>> मोटरवाहन कायदा कडक
>> गावागावांत सीसीटीव्ही

वाहतुकीत शिस्त आणून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने नवीन मोटरवाहन कायदा तयार केला असून त्यानुसार नियमांचे उल्लंघन करणार्‍यांच्या दंडात पाचपट वाढ करण्यात आली आहे. तसेच १८ वर्षांखालील व्यक्तीने वाहन चालवताना अपघात झाल्यास गाडीच्या मालकांना तीन वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकेल, असे वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल विधानसभेत वाहतूक खात्यावरील मागण्यांवर उत्तर देताना सांगितले.

मोटरवाहन कायदा कडक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दारू पिऊन वाहन चालविणार्‍यांना पूर्वी जो ५ हजार रु. दंड होता तो वाढवून १० हजार रुपये करण्यात आला आहे. हेल्मेट न घालणार्‍यांना १०० रुपयांऐवजी नव्या कायद्यानुसार ५०० रुपये दंड ठोठावण्याची तरतूद करण्यात आल्याचे वाहतूक मंत्र्यांनी सांगितले.
गावागावांत सीसीटीव्ही
वाहतुकीत शिस्त आणण्यासाठी वाहतूक खात्याने गावागावांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. हे कॅमेरे सर्व मोक्याच्या ठिकाणी बसवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. म्हापसा, फोंडा, मडगाव येथे नवीन बसस्थानके उभारणार असल्याचे आश्‍वासन त्यांनी यावेळी दिले.
कदंबच्या कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेला असल्याने गोवा सरकारने स्पीड गव्हर्नर (वेग नियंत्रण) वाहनांवर बसवण्याचा निर्णय घेतला आहे, असे ढवळीकर यांनी यावेळी स्पष्ट केले. मायकल लोबोंसह काही आमदारांनी टॅक्सींना वेग नियंत्रक बसवण्यास हरकत घेतली होती.
किनारपट्टी भागातून आणखी एक महामार्ग उभारण्याचा प्रस्ताव असल्याचे ढवळीकर यांनी सांगितले असता कित्येक आमदारांनी सदर महामार्गाला विरोध केला.
२४७ तास पाणीपुरवठा
राज्यातील १०० % लोकांना सुरळीत पाणी पुरवठा मिळावा यासाठी आपले खाते काम करणार असल्याचे ढवळीकर यांनी साबांखावरील मागण्यांना उत्तर देताना सांगितले. राज्यातील जनतेला २४७ तास पाणीपुरवठा करण्याचे जे उद्दिष्ट होते ते पूर्ण करण्यात येईल. पेडणे, गिरी, काणकोण, नेत्रावळी, गांजे उसगाव येथील जलशुद्धीकरण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर जनतेला २४७ तास विनाखंड पाणीपुरवठा करता येणार असल्याचे ते म्हणाले. विविध ठिकाणच्या जुन्या व जीर्ण झालेल्या जलवाहिन्या बदलण्यात येईल. वास्कोला १०० एम्‌एल्‌डी पाणी पुरविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.