यापूर्वी गत 14 महिन्यांत पाच विद्यार्थ्यांनी संपवले होते जीवन; आत्महत्या सत्रामुळे बिट्स पिलानी संस्था संशयाच्या घेऱ्यात
सांकवाळ येथील बिट्स पिलानी शैक्षणिक संस्थेत अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या एका 20 वर्षीय विद्यार्थिनीने रविवारी रात्री आपल्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. विद्यार्थिनी वैष्णवी जितेष (रा. बंगळुरू-कर्नाटक) ही बिट्स पिलानीच्या कॅम्पसमधील मुलींच्या वसतिगृहातील खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने अन्य विद्यार्थी व शिक्षकांमध्ये घबराट पसरली. यापूर्वी मागील 14 महिन्यांच्या कालावधीत बिट्स पिलानींमध्ये पाच विद्यार्थ्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने ही संस्था संशयाच्या घेऱ्यात सापडली आहे. वैष्णवीची आत्महत्या ही यंदाच्या वर्षातील पहिली आणि एकूण सहावी घटना आहे.
सविस्तर माहितीनुसार, बंगळुरू-कर्नाटक येथील रहिवासी असलेली वैष्णवी ही इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होती. बिट्स पिलानी शैक्षणिक संस्थेत तिचे हे तिसरे वर्ष होते. रविवारी रात्री वैष्णवी ही मुलींच्या वसतिगृहातील आपल्या खोलीचे दार उघडत नसल्याचे तिच्या सहकारी विद्यार्थ्यांना कळताच त्यांनी कॅम्पसमधील एका कर्मचाऱ्याच्या सहकार्याने दार उघडले असता, ती गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आली. त्यांनी त्वरित कॅम्पसमधील वरिष्ठांना या विषयी माहिती देताच प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले. संस्थेचे पीआरओ अर्जुन हळणकर यांनी वेर्णा पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
वेर्णा पोलीस निरीक्षक आनंद शिरोडकर व इतर पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी मुरगाव तालुक्याचे पोलीस अधीक्षक गुरुदास कदम सुद्धा घटनास्थळी दाखल झाले. यानंतर कॅम्पस प्रशासन व पोलिसांनी वैष्णवी हिच्या कुटुंबाला घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर वैष्णवीचे कुटुंबीय देखील गोव्यात दाखल झाले.
वेर्णा पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आणि वैष्णवीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मडगावच्या दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात पाठवून दिला. वेर्णा पोलिसांनी भादंसं कलम 194 अंतर्गत अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक आनंद शिरोडकर यांच्या देखरेखीखाली पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी हे प्रकरण गंभीरतेने घेऊन अधिक तपास सुरू केला आहे.
‘बिट्स’मध्ये यापूर्वी
5 विद्यार्थ्यांची आत्महत्या
गतवर्षापासून बिट्स पिलानी शैक्षणिक संस्थेत विद्यार्थ्यांने आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. डिसेंबर 2024 पासून पाच विद्यार्थ्यांनी गळफास आणि विषारी औषध घेऊन आपले प्राण सोडले होते. त्यात सर्व मुलगे होते. आता तर चक्क एका 20 वर्षीय विद्यार्थीनीने गळफास घेऊन आयुष्य संपवले. त्यामुळे पुन्हा एकदा बिट्स पिलानी शैक्षणिक संस्था संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. वाढत्या आत्महत्येचे कारण विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचे वाढते दडपण असू शकते, असाही संशय आहे. यासाठी राज्य सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेऊन संपूर्ण बिट्स पिलानी शैक्षणिक संस्थेची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
आत्महत्यांचा घटनाक्रम
डिसेंबर 2024 मध्ये बीई संगणक विज्ञान आणि एमएससी रसायनशास्त्राच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी ओम प्रियन सिंग याने आत्महत्या केली होती.
मार्च 2025 मध्ये तिसऱ्या वर्षाच्या दुहेरी पदवीचा विद्यार्थी अथर्व देसाईने आपले जीवन संपवले होते.
मे 2025 मध्ये द्वितीय वर्षाच्या दुहेरी पदवी (एमएससी केमिस्ट्री आणि बीई इलेक्ट्रिकल आणि इन्स्ट्रुमेंटेशन) चा विद्यार्थी कृष्णा कासेरा मृतावस्थेत आढळला होता.
ऑगस्ट 2025 मध्ये कुशाग्र जैन हा तृतीय वर्ष अर्थशास्त्र आणि संगणक शास्त्राचा विद्यार्थी त्याच्या वसतिगृहाच्या खोलीत मृतावस्थेत सापडला होता.
सप्टेंबर 2025 मध्ये ऋषी नायर या एमएससी फिजिक्समधील दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती.
प्रभावी उपाययोजनांची गरज : युरी आलेमाव
पणजी (प्रतिनिधी) : बिट्स पिलानीतील विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रकार रोखण्यासाठी ठोस आणि प्रभावी उपाययोजनांची गरज आहे, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे. बिट्स पिलानीमधील आणखी एक आत्महत्या प्रकरण दुर्दैवी आहे. या बिट्स पिलानीमधील यापूर्वीच्या आत्महत्यांच्या घटनांबाबत चौकशी प्रलंबित आहे. कोणताही निष्कर्ष नाही, कोणावरही जबाबदारी निश्चित झालेली नाही. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी सुरू केलेल्या हेल्पलाईन, वेलनेस टॉक आणि समुपदेशन कार्यक्रम अपयशी ठरले आहेत, असेही आलेमाव यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे : गोवा फॉरवर्ड
बिट्स पिलानीमधील सहा विद्यार्थ्यांच्या आत्महत्या हा गंभीर विषय बनला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बिट्स पिलानीतील आत्महत्येच्या विषयावर स्पष्टीकरण देण्याची गरज आहे. या संस्थेमध्ये काही गंभीर गोष्टी घडत असल्याने विद्यार्थी आत्महत्या करीत असल्याचा संशय गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस दुर्गादास कामत यांनी काल व्यक्त केला.