एकीकडे धुरंधर चित्रपटाने भारतात विक्रमी व्यवसाय केला. साडे तीन तासांचा महाचित्रपट असूनही त्याने लोकप्रियतेचे उच्चांक प्रस्थापित केले. आता तर तो नेटफ्लिक्सवरही अवतरला आहे. दुसरीकडे, ज्या बलुचींच्या मदतीने पाकिस्तानला अद्दल घडवण्याची बात हा चित्रपट करतो, त्या बलुचिस्तानमधील लढवय्यांनी पाकिस्तानी सेनेची झोप सध्या उडवली आहे. दोन दिवसांपूर्वी ज्या प्रकारे बलुचिस्तान लिबरेशन आर्मी म्हणजे बीएलएच्या बंडखोरांनी पाकिस्तानी सैन्याविरुद्ध तेथील जिल्ह्याजिल्ह्यांतून ज्या प्रकारे भीषण हल्ले चढवले, ज्या प्रकारे सैनिकांना अल्लाच्या घरी पाठवले गेले, ज्या प्रकारे ओलीस ठेवले गेले, ज्या प्रकारे महिला फिदायीनचा वापर केला गेला, ते सगळे पाहिले, तर बलुचिस्तानमधील असंतोष आता कोणत्या थराला जाऊन पोहोचला आहे याची कल्पना येते. बलुचिस्तानमधील संघर्ष हा जगातील दीर्घकाळ चाललेल्या संघर्षापैकी एक मानला जातो. फाळणीनंतर जेव्हा स्वतंत्र पाकिस्तानची निर्मिती झाली, तेव्हापासूनच हा संघर्ष चालत आला आहे. मात्र बळाच्या जोरावर, शस्त्रांच्या धाकावर हा संघर्ष दडपण्याचा आटोकाट प्रयत्न पाकिस्तानने, त्याच्या मुख्यत्वे पंजाबी नेतृत्वाने आजवर केला. मात्र बलुचिस्तानचा आवाज त्यांना आजवर दडपता आलेला नाहीच, उलट तो अधिकाधिक प्रखर होत चालला आहे. बलुचिस्तानचे आर्थिक शोषण ज्या प्रकारे पाकिस्तानने चालवले आहे, आधी चीनसाठी आणि आता अमेरिकेसाठी बलुचिस्तानमधील नैसर्गिक संसाधनांची ज्या प्रकारे लूट करण्याचे प्रयत्न पाकिस्तानने चालवले आहेत, त्याविरुद्धचा हा एल्गार आहे. दोन वर्षांपूर्वी हेरोफ – 1 ह्या मोहिमेतून बलुचिस्तानी बंडखोरांनी पाकिस्तानी सैन्याला सळो की पळो करून सोडले होते. जाफर एक्स्प्रेसवरील हल्ल्याने बलुचिस्तानच्या संघर्षाकडे जगाचे लक्ष तेव्हा वेधले गेले होते. आता हे हेरोफ 2 चालले आहे. ज्या प्रकारे एकाचवेळी बलुचिस्तानच्या जिल्ह्याजिल्ह्यांतून हे रक्तरंजित हल्ले झाले, ते पाहाता किती मोठ्या प्रमाणात आणि पूर्ण समन्वयानिशी, पूर्ण सज्जतेनिशी बलुचिस्तानची स्वातंत्र्यप्रेमी जनता लढते आहे हे दिसते. ह्यावेळी महिला फिदायीन म्हणजे आत्मघाती महिला ह्या हल्ल्यांमध्ये सामील झालेल्या होत्या. हवा बलोच आणि असीफा मेंगल ह्या दोन कोवळ्या तरुणींनी हाती शस्त्रे घेऊन पाकिस्तानी सैनिकांना कसे कंठस्नान घातले आणि शेवटी आत्मघाती स्फोटाद्वारे त्यांचे कसे मोठे नुकसान घडवले त्याच्या बातम्या आता सर्वत्र पसरल्या आहेत. बलुचिस्तानच्या आंदोलनातील हे एक नवे वळण आहे. हवा बलोचने तर थेट ग्वादार बंदरावरील सुरक्षा यंत्रणेलाच लक्ष्य केले. कोवळ्या मुलीही बलुचिस्तानमधील ह्या संघर्षात उतरत आहेत, आम नागरिकांचा सक्रिय पाठिंबा ह्या बंडखोरांना लाभत आहे हा पाकिस्तानसाठी धोक्याचा इशारा आहे. प्रत्येकवेळी भारताकडे बोटे दाखवून ह्यासाठी अकांडतांडव करता येणार नाही. बलुचिस्तानचे ज्या प्रकारे आर्थिक शोषण पाकिस्तान करू पाहते आहे, तेथील नैसर्गिक वायू, तांबे, कोळसा, सोने आणि दुर्मीळ खनिजे लुटू पाहात आहे आणि दुसरीकडे राजकीय हक्क, स्वायत्तता, अधिकार ह्याबाबत मात्र सतत नन्नाचा पाढा वाचत आहे, त्याविरुद्ध आता आम बलुची पेटून उठला आहे. त्यामुळेच तो ह्या बंडखोरांना सर्वतोपरी सहाय्य करताना दिसतो आहे. चळवळी दडपण्यासाठी नेत्यांच्या हत्या करायच्या, आंदोलकांना रातोरात गायब करायचे ही तंत्रे आता चालणारी नाहीत. पाकिस्तानला बलुचिस्तानच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष पुरवावे लागणार आहे. परवाच्या हल्ल्यासंदर्भात दोन्ही बाजूंनी परस्परांचे मोठे नुकसान झाल्याचे दावे केले आहेत, पण ज्या प्रकारे जिल्ह्याजिल्ह्यातून हे दहशतवादी हल्ले झाले आहेत ते पाहता पाकिस्तानी सैन्याचे आणि फ्रंटियर कॉर्प्सचे मोठे नुकसान निश्चितपणे झालेले आहे. एकीकडे पाकिस्तानी तालिबानने उत्पात माजवलेला आहे. आता दुसरीकडे बलुचिस्तान धुमसू लागले आहे. राजकीय अस्थिरता, आर्थिक डबघाई आणि त्यात हा रक्तरंजित संघर्ष यातून पाकिस्तानचे कंबरडे मोडण्याची वेळ आलेली आहे. अशा वेळी चीन आणि अमेरिकेला गळामिठ्या मारल्याने पाकिस्तानची समस्या सुटणारी नाही. बलुचिस्तानचे धुरंधर उद्या अमेरिकेलाही पुरून उरतील. पाकिस्तानने त्या प्रदेशाचे शोषण थांबवणे जरूरी आहे. त्यांना अधिक प्रांतिक स्वायत्तता देण्यासंदर्भात त्या बंडखोर गटांशी बोलणी सुरू करणे जरूरी आहे. जोरजबरदस्तीने, अत्याचारांनी त्यांचे आंदोलन चिरडून टाकणे परवडणारे नाही हा संदेशच जणू ह्या ताज्या सर्वव्यापी हल्ल्यांनी ह्या बंडखोरांनी पाकिस्तानला दिलेला आहे. आता तो मानायचा की नाही हे शेवटी त्यांच्यावर असेल, परंतु न मानल्यास उद्या होणारे नुकसान मोठे असेल हे निश्चित.