Home Featured केंद्रीय अर्थसंकल्पाचा गोव्याला फायदा : मुख्यमंत्री

केंद्रीय अर्थसंकल्पाचा गोव्याला फायदा : मुख्यमंत्री

0

पर्यटन, कृषी, आरोग्य, साधनसुविधा, नील अर्थव्यवस्था, शिक्षण क्षेत्राकरिता फायदेशीर

2026-27 या नव्या आर्थिक वर्षासाठीच्या केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे गोव्याला पर्यटन, कृषी, आरोग्य, साधनसुविधा, नील अर्थव्यवस्था, साधनसुविधा विकास, शिक्षण अशा सर्वच क्षेत्रात चांगला विकास साधता येणार असल्याचे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या आर्थिक वर्षासाठी मांडलेला अर्थसंकल्प हा ‘विकसित भारत’ या संकल्पनेचा पाया घालणारा अर्थसंकल्प असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. जनतेला केंद्रस्थानी ठेऊन हा अर्थसंकल्प तयार करण्यात आलेला असून, तो मध्यमवर्गीयांसाठी सर्व घटकांचे सबलीकरण करणारा अर्थसंकल्प असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गोवा सरकारने केंद्राकडे अर्थसंकल्पपूर्व ज्या मागण्या केल्या होत्या, त्या सर्व मागण्या केंद्र सरकार पूर्ण करणार आहे. गोवा सरकारने कुशावती या तिसऱ्या जिल्ह्यात साधनसुविधा उभारण्यााठी 500 कोटी रुपये, पर्यावरण संरक्षण साधनसुविधांसाठी 600 कोटी, औद्योगिक कॉरिडोरसाठी 1 हजार कोटी, सांडपाणी व कचरा व्यवस्थापनासाठी 600 कोटी, आरोग्य क्षेत्रासाठी 300 कोटी रुपये एवढ्या निधीची मागणी केली होती. त्याशिवाय खाजन शेतीच्या विकासासाठीही वेगळ्या निधीची मागणी केली होती. या सगळ्या मागण्या पूर्ण होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

खाजन शेतीसाठीच्या निधीला नीती आयोगाने मान्यता दिलेली आहे. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनासाठीचा निधीही मंजूर होण्याच्या मार्गावर आहे. कुशावती या तिसऱ्या जिल्ह्यासाठीचा निधी हा 50 वर्षांसाठीचे व्याजमुक्त कर या केंद्राच्या योजनेखाली राज्याला मिळणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. औद्योगिक कॉरिडोरसाठीचा निधीही 50 वर्षांसाठीचे व्याजमुक्त कर्ज या योजनेखालीच मिळणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. काणकोण येथील बगल मार्गासाठी 300 ते 400 कोटी रुपये एवढा अतिरिक्त निधीही मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. नारळ व काजू या पिकांना चालना देण्यासाठीची जी योजना यंदाच्या अर्थसंकल्पात आहे. त्या योजनेचा चांगला फायदा गोव्याला मिळेल. नील अर्थव्यवस्थेसाठीच्या योजनेचाही गोव्याला चांगला फायदा होणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
पर्यटन क्षेत्रासाठी नव्या योजना

पर्यटन क्षेत्रासाठी ज्या नव्या योजना तयार करण्यात आलेल्या आहेत, त्या योजनांचाही गोव्याला फायदा होणार आहे. वारसा पर्यटनावर अर्थसंकल्पात भर देण्यात आलेला असून, त्याचा फायदा गोव्याला होणार आहे. टुरिस्ट गाईड्सचे कौशल्य वाढवण्यासाठीची योजना असून, या योजनेचा चांगला फायदा गोव्याला मिळणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

विकसित भारताचा अर्थसंकल्प
अमृतकाळाला चालना देणारा व विकसित भारताचे स्वप्न साकार करणारा असा हा अर्थसंकल्प असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी मंत्री सुभाष शिरोडकर व माविन गुदिन्हो यांनीही यावेळी अर्थसंकल्पाविषयी आपली मते व्यक्त केली.