बाल संगोपन रजा हा शिक्षिकांचा हक्क : पार्सेकर

0
134

ज्या शिक्षिकांना बाल संगोपन रजा (चाईल्ड केअर) हवी आहे त्या शिक्षिकांना ती द्यायला हवी. तो त्यांचा हक्क आहे. ही रजा देऊन आपण त्या शिक्षिकेवर मोठे उपकार करीत आहोत अशा भ्रमात कुठल्याही विद्यालयाच्या व्यवस्थापनाने राहू नये, असे शिक्षण मंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल गोवा विधानसभेत सांगितले. प्रश्‍नोत्तराच्या तासाला आमदार राजन नाईक यांनी विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर देताना त्यानी वरील स्पष्टीकरण केले.

सरकारी अनुदानीत विद्यालयात कायमस्वरुपी अथवा प्रोबेशनवर काम करणार्‍या एखाद्या शिक्षिकेला ती गरोदर असताना घेतलेल्या रजेच्या काळात तिला गोवा विद्यापीठात अथवा विद्यापीठाशी संलग्न गोव्यातील महाविद्यालयात कंत्राटी पध्दतीवर अथवा लेक्चर पध्दतीवर शिकवता येते काय, असा मूळ प्रश्‍न नाईक यांनी विचारला होता. काही शिक्षिका तसे करीत असल्याचे नाईक यांचे म्हणणे होते. यावर एखाद्या पूर्ण वेळ शिक्षिकेला तसे करता येत नसल्याचे पार्सेकर यांनी स्पष्ट केले. मात्र, अर्धवेळ शिक्षिका तशा प्रकारे शिकवू शकत असल्याचे पार्सेकर यांनी स्पष्ट केले.
बरेचशे पूर्णवेळ शिक्षक अतिरिक्त पैसे कमावण्यासाठी अन्य वेगवेगळे उद्योग करतात. काही जण शिकवण्याही देतात. मात्र, हे बेकायदा असल्याचे पार्सेकर यांनी नमूद केले. यावेळी हस्तक्षेप करताना आमदार प्रमोद सावंत म्हणाले की काही शिक्षिकांना त्यानी ‘चाईल्ड केअर लिव’ मागितल्यास ती नाकारण्यात येते.
यावर बोलताना पार्सेकर म्हणाले की शिक्षिकाना ही रजा नाकारली जाऊ नये. एखादी शिक्षिका ही रजेवर गेली तर त्या जागी दुसरी शिक्षिका घेता येते. रजेवर असलेल्या शिक्षिकेला जसा पगार मिळतो. तसाच तिच्या जागी शिकवण्यासाठी घेतलेल्या दुसर्‍या शिक्षिकेलाही सरकार पगार देते. त्यामुळे रजा नाकारण्याचा प्रश्‍नच नसल्याचे पार्सेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.