पणजी-रेईश मागूश किल्ल्यादरम्यान लवकरच रोप वे : दिलीप परुळेकर

0
70

म्यानचा रोप वे प्रकल्प उभा राहण्यास सात-आठ महिन्याचा अवधी लागेल, अशी माहिती पर्यटन मंत्री दिलीप परुळेकर यांनी काल गोवा विधानसभेत दिली. प्रश्‍नोत्तराच्या तासाला पणजीचे आमदार सिध्दार्थ कुंकळ्येकर यांनी विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर देताना परुळेकर यांनी वरील माहिती दिली.

यासंबंधी अधिक माहिती देताना परुळेकर म्हणाले की, या प्रकल्पामुळे राज्यात येणार्‍या देशी-विदेशी पर्यटकांच्या संख्येत वाढ होणार आहे. त्याशिवाय वरील प्रकल्पामुळे तो उभारणार्‍या कंपनीला जो निव्वळ नफा मिळणार आहे त्यातील ५ टक्के नफा गोवा सरकारला मिळणार असल्याने राज्याला सुमारे २० कोटी रु. एवढा महसूल प्राप्त होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. १९० कोटी रु. एवढी गुंतवणूक करून खासगी कंपनी हा प्रकल्प उभारणार असल्याने सरकारला या प्रकल्पावर एक रुपयाही खर्च करावा लागणार नसल्याचे परुळेकर यांनी यावेळी सांगितले. कंपनीला फक्त जमीन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सरकारची असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी प्रश्‍न विचारताना कुंकळ्येकर म्हणाले की हा प्रकल्प उभारण्यासाठीची प्रक्रिया जून २०१५ पासून सुरू झाली होती. मात्र, आता प्रकल्पाचे काम का रखडले आहे ते कळण्यास मार्ग नसल्याचे ते म्हणाले. यावर उत्तर देताना परुळेकर म्हणाले की या प्रकल्पासाठीची फाईल ही अर्थ खात्याकडे गेलेली आहे. नंतर ती फाईल ‘पीपीपी सेल’कडे जाईल. नंतर फाईल मंत्रिमंडळाकडे येणार आहे.
यावर बोलताना कुंकळ्येकर म्हणाले की गेले सात महिने हा प्रकल्प अडून पडलेला आहे. तो लवकर मार्गी लागावा. शिवाय या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार प्राप्त होणार असून त्याचा लाभ गोमंतकीयांनाच मिळावा अशी मागणी कुंकळ्येकर यांनी यावेळी केली. यावर उत्तर देताना या प्रकल्पातून जो रोजगार निर्माण होणार आहे त्यापैकी ६० ते ६५ टक्के रोजगार हा गोमंतकीयानाच मिळणार असल्याचे परुळेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.