बारा आमदार अपात्रताप्रकरणी सभापतींकडून निवाडा राखीव

0
93

गोवा विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर यांनी बारा आमदारांच्या विरोधातील दोन अपात्रता याचिकांवर सुनावणी घेऊन कॉंग्रेस, मगोप आणि कॉंग्रेसमधून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या दहा आमदारांची बाजू काल ऐकून घेतली असून निवाडा राखून ठेवला आहे.

मगोपचे ज्येष्ठ नेते सुदिन ढवळीकर यांनी मगोपमधून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या दोन आमदारांविरोधात दाखल अपात्रता याचिकेवर प्रथम सुनावणी घेण्यात आली. मगोपचे वकील ऍड. धवल झवेरी यांनी मगोपची बाजू मांडली. मगो पक्षातून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या दोन आमदारांनी सभापतींसमोर सादर केलेल्या कागदपत्रांना विरोध करण्यात आला आहे, अशी माहिती ऍड. झवेरी यांनी दिली. सुनावणीच्यावेळी मगोचे ज्येष्ठ नेते ढवळीकर यांची उपस्थिती होती.

गोवा प्रदेश कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी कॉंग्रेसमधून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या १० आमदारांविरोधात दाखल अपात्रता याचिकेवर संध्याकाळच्या सत्रात सुनावणी घेण्यात आली. कॉंग्रेस पक्षाने केलेल्या दाव्यात कोणतेही तथ्य नाही. कॉंग्रेस पक्षात पडलेल्या फुटीचे भक्कम पुरावे आणि साक्षीदारांची माहिती सभापतींसमोर ठेवण्यात आली आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या दहा आमदारांना बाजू मांडण्यासाठी वेळ वाढवून देण्याची विनंती करण्यात आली आहे, अशी माहिती पक्षांतर केलेल्या दहा आमदारांचे वकील ऍड. निखिल वझे यांनी सुनावणीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.

भाजपमध्ये प्रवेश केलेल्या १० आमदारांच्यावतीने करण्यात आलेला दावा खोडून काढत पक्षांतर केलेल्या आमदारांकडून वेळकाढूपणा केला जात असल्याचा युक्तिवाद करण्यात आल्याची माहिती कॉंग्रेसचे ऍड. अभिजित गोसावी यांनी दिली.