बारावीचा निकाल ९९.४० टक्के

0
148

>> अध्यक्ष भगिरथ शेट्ये यांची माहिती; विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक

बारावी परीक्षेचा यंदाचा निकाल ९९.४० टक्के लागला आहे. गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने काल बारावीचा निकाल जाहीर केला. बारावीच्या परीक्षेला एकूण १८ हजार १९५ विद्यार्थी बसले होते, त्यापैकी १८,०८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष भगिरथ शेट्ये यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

बारावी कला शाखेचा निकाल ९९.३९ टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ९९.६६ टक्के, विज्ञान शाखेचा निकाल ९९.६८ आणि व्यावसायिक शाखेचा निकाल ९८.५१ टक्के एवढा लागला आहे.
कला शाखेतील ४७४५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी ४७१६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेतील ५५९३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी ५५७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेतील ४६९८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी ४६८३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. व्यावसायिक शाखेतील ३१५९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी ३११२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, असे शेट्ये यांनी सांगितले.
मंडळातर्फे पुरवणी परीक्षा लवकरच घेतली जाणार आहे. जे विद्यार्थी परीक्षेला बसण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांच्यासाठी परीक्षा लवकरच जाहीर केली जाणार आहे, असेही शेट्ये यांनी सांगितले.

महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू
दरम्यान, राज्यातील महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेला मंगळवार दि. २० जुलैपासून प्रारंभ होणार आहे. राज्यातील खासगी आणि सरकारी महाविद्यालयासाठी ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज स्वीकारले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी तीन पर्याय उपलब्ध करण्यात आले आहेत. सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे.

अकरावीसाठी सीईटी परीक्षा २७ किंवा २८ जुलैला
अकरावी विज्ञान शाखा आणि डिप्लोमा प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या समान प्रवेश परीक्षेची (सीईटी) तयारी करण्यात आली आहे. येत्या २७ किंवा २८ जुलैला ही परीक्षा घेतली जाऊ शकते. मंडळातर्फे सीईटी परीक्षा उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये घेतली जाणार आहे. सुमारे साडे तीन हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. नियमित विद्यार्थ्यांना शुल्क आकारले जात नाही. केवळ अन्य विद्यार्थ्यांकडून ५०० शुल्क आकारले जात आहे, असे भगिरथ शेट्ये यांनी सांगितले.