धनगर समाजाला ‘एसटी’चा दर्जा द्या

0
97

>> मुख्यमंत्र्यांकडून केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांना निवेदन सादर

गोव्यातील गवळी-धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये (एसटी) समावेश करावा, या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल नवी दिल्ली येथे केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा यांना सादर केले. दरम्यान, काल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची देखील भेट घेतली.

यावेळी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, सभापती राजेश पाटणेकर, खासदार विनय तेंडुलकर, मंत्री मिलिंद नाईक, सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर, गोवा सरकारचे सल्लागार एन. डी. आगरवाल व इतर मान्यवरांची उपस्थिती होती.
केंद्रीय मंत्री मुंडा यांनी या विषयाला प्राधान्य देण्याचे आश्‍वासन दिले. या विषयावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. गेली ३० वर्षे गोव्यातील धनगर समाजाच्या मागणीचा प्रश्‍न प्रलंबित आहे. आता या समाजाला एसटी दर्जा मिळवून देण्यासाठी पुन्हा हालचाली सुरू झाल्याने त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

मोदी, गडकरी यांची घेतली भेट
नवी दिल्लीत दाखल झालेल्या मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. तसेच मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि मंत्री पाऊसकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन राज्यातील राज्य, महामार्ग व इतर रस्ते, पूल बांधणी आदी विषयावर चर्चा केली.