पर्तगाळ मठाधीश श्रीमद् विद्याधिराजतीर्थ स्वामीजींचे महानिर्वाण

0
211

>> पर्तगाळ मठात घेतला अखेरचा श्‍वास; समस्त अनुयायांवर शोककळा

पर्तगाळ (काणकोण) येथील श्री गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाचे २३ वे पीठाधीश प. पू. श्रीमद् विद्याधिराजतीर्थ वडेर स्वामीजी यांचे काल सकाळी ११.४५ च्या सुमारास ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने वयाच्या ७६ व्या वर्षी मठसंकुलाच्या पवित्र परिसरातच महानिर्वाण झाले. काल रात्री पर्तगाळी मठातील पवित्र समाधी स्थळी त्यांच्यावर विधिवत समाधीचे सोपस्कार करण्यात आले. सारस्वत ज्ञातीच्या पर्तगाळ गुरूपीठाचे अधिपती म्हणून गेली पाच दशके कार्यरत असताना स्वामीजींनी संपूर्ण समाजाशी नाते जोडणारे समाजाभिमुख उपक्रमही सातत्याने राबविले होते. त्यामुळे स्वामीजींच्या महानिर्वाणाचे वृत्त येताच गोमंतक आणि सर्वदूर पसरलेल्या स्वामीजींच्या अनुयायांमध्ये शोककळा पसरली.

सदोदित संन्यस्त परंतु समाजाभिमुख जीवन जगत आलेल्या स्वामीजींनी मठपरंपरा पुढे नेताना तिला चौफेर सामाजिक कार्याद्वारे उंची प्राप्त करून दिली होती. नव्या मठांची स्थापना, जुन्या मठांचा जीर्णोद्धार, कल्याण मंडप, वृद्धाश्रमांची, शाळा, इस्पितळाची उभारणी अशा विविध कामांबरोबरच गुणवंत विद्यार्थी गौरव, विद्याधिराज पुरस्कार अशा विविध सामाजिक उपक्रमांद्वारे त्यांनी ज्ञातिबांधवांना मठपरंपरेशी जोडून घेतले होते.

इस्पितळात दाखल होण्यास नकार
सोमवारी सकाळी १०.३० च्या दरम्यान स्वामीजींच्या छातीत दुखायला लागल्यानंतर त्वरित काणकोणचे शल्यचिकित्सक डॉ. अमन प्रभुगावकर यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी स्वामीजींना इस्पितळात हलविण्याची विनंती केली; परंतु स्वामीजींनी त्याला नकार दिला, अशी माहिती दिनेश पै यांनी दिली.

…अन् स्वामीजींची प्राणज्योत मालवली
स्वामीजींना त्वरित प्राणवायूची आवश्यकता भासली. त्यावेळी जनसेनेचे जनार्दन भंडारी यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी त्वरित प्राणवायूची सोय केली; परंतु त्याचा विशेष प्रभाव पडला नाही. त्यानंतर स्वामीजींची प्राणज्योत मालवली, असे दिनेश पै यांनी सांगितले.

भक्तांची मठात गर्दी
प. पू. श्रीमद् विद्याधिराजतीर्थ वडेर स्वामीजींचे महानिर्वाण झाल्याचे वृत्त समजताच काणकोण तालुक्यातील विविध भक्तांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पर्तगाळी मठात एकच गर्दी केली होती. यावेळी मठ समितीचे भाई नायक, माजी आमदार विजय पै खोत, डॉ. राजन कुंकळयेकर, पुतू पै, मठ समितीचे अन्य पदाधिकारी, गोवा, कर्नाटक तसेच अन्य प्रांतातून आलेले मठाचे अनुयायी उपस्थित होते. दुपारी १२ वाजल्यापासून सतत मठात मंत्रघोष चालू होता. सर्वत्र दु:खाची छाया पसरली होती.

मान्यवरांनी घेतले अंत्यदर्शन
पर्तगाळी मठ समितीचे अध्यक्ष तथा उद्योजक श्र्‌रीनिवास धेंपे, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांच्यासह मान्यवरांनी स्वामीजींचे अंत्यदर्शन घेण्यासाठी उपस्थिती लावली होती. त्यांनी आठवणींना उजाळा देत स्वामीजींना श्रद्धांजली वाहिली.

स्वामीजींना झाला होता दिव्य दृष्टांत
पर्तगाळ मठाच्या जमीनीची जबाबदारी पाहणार्‍या महेश नायक या अभियंत्याला आठ दिवसांपूर्वीच स्वामीजींनी आपल्या निर्वाणाची कल्पना दिली होती. आपल्या महानिर्वाणानंतर कोणत्या जागी समाधी द्यावी, ती जागा, तसेच त्यानंतर करावयाच्या सर्व सोपस्कारांची माहिती स्वामीजींनी महेश नायक यांना दिली होती.

पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
श्रीमद् विद्याधिराजतीर्थ वडेर स्वामीजी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांचे समाज सेवेतील कार्य, विशेषत: आरोग्य क्षेत्रातील कार्य नेहमीच स्मरणात राहील. त्यांच्या असंख्य अनुयायांप्रती आपल्या संवेदना आहेत, असे पंतप्रधानांनी ट्विटवरील शोक संदेशात म्हटले आहे.