प्रतीक दर्शन

0
253

योगसाधना – ४९४
अंतरंग योग – ७९

  • डॉ. सीताकांत घाणेकर

प्रतीक ही मौनाची भाषा आहे. शांतीचे संगीत आहे. संस्कृतीच्या महिम्याचे मूक गीत आहे. प्रतीकोपासना म्हणजे बिंदूमध्ये सिंधू पाहण्याची किंवा घागरीत सागर सामावण्याची शक्ती आहे. प्रतीक म्हणजे शब्दांच्या गैरहजेरीत विचार व्यक्त करण्याची व्यवस्था.

भगवंताने विचारपूर्वक, बुद्धिपूर्वक बनवलेले विश्‍व अगदी सुनियोजित, अगाध कलाकृती आहे. आपल्यातील बहुतेकजण फक्त मानवजन्म घेतो, जीविकेसाठी आवश्यक शिक्षण घेतो, संसार करतो… आणि एक दिवस जगातून निघून जातो. म्हणजे फक्त जे नश्‍वर आहे तेच पंचमहाभूतांत विलीन होते.

सामान्य मानव यापुढे थोडासुद्धा विचार करत नाही. मग अभ्यास, चिंतन सोडाच, याचे कारण म्हणजे देवाच्या या कलाकृतीबद्दल तो गंभीर नाही. म्हणजे एका पशू- पक्षी- जनावरासारखेच आपले जीवन झाले. मग या सृष्टिकर्त्याने आपल्या उत्कृष्ट कलाकृतीला, आवडत्या मुलाला- मानवाला एवढी स्वतःइतकीच बुद्धी कशाला दिली? असे अनेकजण त्यापलीकडे अवश्य जातात. हे म्हणजे आपले संत-महात्मे, ऋषी-महर्षी… यांना विश्‍वाची चिंता आहे. त्यामुळे ते ध्यान- चिंतन करतात. सृष्टीचे गूढ समजून घेतात. विविध तर्‍हेने- कथागोष्टी, कविता, भजने- प्रवचने… आमच्यासारख्या सामान्यांना सोपे करून समजावतात. पण आपण या गोष्टी ऐकतो, वाचतो, सांगतो. पण बहुतेकवेळा आचरण करत नाही. म्हणजे धारण करीत नाही. अंतरंगयोगामध्ये म्हणूनच तीन महत्त्वाच्या पायर्‍या आहेत- धारणा- ध्यान- समाधी.

‘धारणा’ व्यवस्थित केली की ‘ध्यान’ सोपे होते. ‘समाधी’ अवस्थेत व्यक्ती आपोआप पोचते. त्यासाठी अध्यात्माची आवड हवी. आम्हाला बहुतकरून आवड म्हणजे भौतिकतेची.
भारताचा सांस्कृतिक वारसा फार मोठा आहे. हजारो वर्षांचा आहे. त्या संस्कृतीमधील विविध सण आपण वेळोवेळी बघितले- बघत आहोत. कोणकोणत्या महापुरुषांची या सणांबद्दल छान मते बघितली. तसाच एक अत्यंत महत्त्वपूर्ण व मार्गदर्शक विषय म्हणजे- प्रतीक दर्शन.
वैश्‍विक स्वाध्याय परिवाराचे प्रणेते प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले या विषयावर आपले अमूल्य विचार आपल्या प्रवचनांतून अनेकवेळा प्रकट करतात.

  • ‘‘प्रतीक’’ म्हणजे आपली सांस्कृतिक सूत्रे आहेत. सूत्रे अल्पाक्षरात असतात. असंदिग्ध असतात, सारगर्भित व व्यापक अर्थ प्रगट करणारी असतात. प्रतीकांबद्दलही तसेच आहे. जसा एका लहानशा सूत्रात अत्यंत अर्थ सामावलेला असतो, एका लहानशा बीमध्ये विशाल वृक्षाचा विस्तार सामावलेला असतो तसा प्रत्येक प्रतीकामागे भव्य भावनांचा सुगंध लपलेला असतो. ही भावनाच प्रतीकांना अर्थवान, सामर्थ्यशील व जिवंत बनवते.’’
    पतंजली महर्षींनी तर एवढे अगाध योगशास्त्र सूत्ररूपातच समाजासमोर मांडले.
  • युज्यते अनेन इति योगः|
    ‘‘जो जोडणारा आहे तो योग’’- असा सोपा साधा सरळ अर्थ. सर्वांना लगेच समजणारा- अशिक्षित व सुशिक्षिताना, लहान- तरुण- वृद्धांना, भारतीय- परदेसीयांना. पण मग पुढे काय- काय जोडायचे असते हे तत्त्वज्ञान आलेच. मीलन कुणाचे हा प्रश्‍न येतोच.
    सुरुवातीला शरीर- मनाला जोडणे ज्यामुळे आसने, प्राणायाम, प्रार्थना, ध्यान-धारणा शास्त्रशुद्ध होते. तदनंतर जसजशी आध्यात्मिक प्रगती होते तेव्हा सूक्ष्म अर्थ दिसायला लागतो- आत्मा व परमात्मा यांचे मीलन… जिवंत असताना व मृत्यूनंतरदेखील.
    हे समजता समजता आणखी एक गूढ विचार –
  • मीलन म्हणजे फक्त शारीरिक व मानसिक. नाहीतर भावमीलन. खरे म्हणजे असे अर्थपूर्ण, भावपूर्ण मीलन योगसाधनेत अपेक्षित आहे. तरंच साधनेचे सगळे पैलू समजतील व फायदे होतील.
  • योगः चित्तवृत्ती निरोधः|- पतंजली सूत्र
  • आपल्या चित्तावर नियंत्रण म्हणजे योग. इतर अनेक ऋषींनीसुद्धा अशीच सूत्रे सांगितली.
  • मनः प्रशमनोपाय योग इत्यातीधीयते| – महर्षी वसिष्ठ.
  • मनाचे प्रशमन करणे म्हणजे योग.
    मन अत्यंत चंचल आहे. त्याचे नियंत्रण व प्रशमन करणे.. हे म्हणणे सोपे पण शास्त्रशुद्ध योगसाधनेशिवाय ते अशक्य आहे.
    श्रीमद्भगवद्गीतेतील काही श्लोकांचा एक थोडा विशिष्ट भाग सूत्रे म्हणून वापरला जातो.
  • समत्वं योग उच्यते | गीता- २.४८
    मानवाच्या जीवनात विविध विरोधी परिस्थिती येतच असतात- सुख-दुःख; यश-अपयश; मान-अपमान… अशा वेळी मन समभावाने राखणे. इथेसुद्धा साम्यता अत्यावश्यक आहे.
  • ः कर्मसु कौशलम् |’ – गीता २.५०
  • कर्म करण्यातील कौशल्य म्हणजे योग. प्रत्येकाचे कर्म वेगवेगळे. ते करण्यात कौशल्य हवे. तरच अपेक्षित फळ मिळेल.
    उत्कृष्ट धनुर्धर अर्जुनाचा विषाद दूर करण्यासाठी भगवंताला अठरा अध्याय सांगावे लागले. त्यांत अशी अनेक सूत्रे सापडतील. त्यातील ही प्रमुख सूत्रे.
    आपला मुख्य विषय आहे – प्रतीके- सांस्कृतिक सूत्रे. मानवी जीवनात अनेक प्रतीके आहेत. त्यातील काहींचा विचार करूया.
  • राष्ट्रध्वज – प्रत्येक देशाचा एक स्वतंत्र ध्वज असतो. तो कपड्याच्या अथवा कागदाच्या लहानशा तुकड्यावर असतो. त्यांची लांबीरुंदी महत्त्वाची नाही तर जनतेच्या भावना मुख्य आहेत. तसे पाहिले तर त्या कपड्याचे व कागदाचे मूल्य अगदी थोडेसे. पण भारताच्या सांस्कृतिक व तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने राष्ट्रध्वज अमूल्य आहे. त्या ध्वजाच्या रक्षणासाठी लाखों लोक प्राणार्पण करायला तयार आहेत. केलेले आहे. करीतही आहेत. मोठमोठ्या लढाया, युद्धं राष्ट्रध्वजाच्या रक्षणासाठी लढली जातात. त्यामुळे ध्वजाचा मान राखणे हे प्रत्येक देशातील प्रत्येक नागरिकाचे पवित्र कर्तव्य आहे. त्याचा अपमान कुणीही केला तर क्रोध आला पाहिजे. तसेच जो कुणी तसे करतो त्याला कडक शिक्षा अपेक्षित आहे. पण ही भावना सर्वांना समजली आहे का?
    देशातील काही मुख्य दिवशी- उदा. स्वातंत्र्यदिन- आपण संपूर्ण मानवंदना देऊन अत्यंत सन्मानाने ध्वजारोहण करतो, तेही अतिमहनीय व्यक्तींकडून- राष्ट्रगीत वाजवून. हे सर्व करणे राष्ट्राभिमानामुळे आवश्यक आहेच. त्या दिवशी ज्यांनी राष्ट्रासाठी जीवनदान दिले त्यांची आपण आवर्जून आठवण करतो.

त्यादिवशी अनेक व्यक्तींच्या हातात, बहुतांशी, शाळकरी मुलामुलींच्या हातात एक लहान राष्ट्रध्वज असतो. कार्यक्रमाच्या वेळी व तदनंतर काही वेळ आपण तो ध्वज घेऊन मिरवतो. पण काही वेळानंतर तो राष्ट्रध्वज कुठेतरी कोपर्‍यात, चिखलात पडलेलासुद्धा आढळतो. राष्ट्राच्या प्रतिष्ठेसाठी ही गोष्ट भूषणावह नक्कीच नाही. ही घटना बघून अनेक व्यक्ती संताप व्यक्त करतात. पण लोकशिक्षण कोण करणार? आपल्या राष्ट्रध्वजाचे महत्त्व कोण समजावणार? आपल्यातील प्रत्येकाचे ते आद्य पवित्र कर्तव्य आहे.

  • दुसरे प्रतीक म्हणजे देवाच्या मूर्तीचे. खरे म्हणजे तो म्हणजे एक साधा रस्त्याच्या कुशीत पडलेला दगड आहे. मूर्तिकाराने आपली सर्व कर्तृत्वशक्ती व कल्पनाशक्ती वापरून अत्यंत कौशल्याने त्या दगडापासून एक सुंदर, आकर्षक मूर्ती बनवलेली असते. सामान्य दगडाला शेंदूर फासला तर त्याचे रूपांतर देवात होते. त्याची पूजा होते. याचे कारण म्हणजे जनतेची भावना व भावपूर्ण भक्ती, तशीच मूर्तीबद्दल श्रेष्ठ श्रद्धा!
  • भारतात अत्यंत प्रचलित व अनंत काळापासून चालत आलेली प्रथा म्हणजे- स्त्रिया कपाळाला लावत असलेले कुंकू व हातात घालत असलेल्या बांगड्या. या वस्तू तशा सामान्यच आहेत. पण त्या स्त्रीच्या सौभाग्याचे लेणे आहे. त्यामागील पवित्र भावनेमुळे त्यांचे महत्त्व अनेक पटींनी वाढले आहे.

दुर्भाग्याने आज अज्ञानामुळे व विपरीत ज्ञानामुळे त्यांचे तेवढे महत्त्व तथाकथित सुशिक्षित व श्रीमंत समाजात नसेल पण खरा भारत जो खेड्यांत वसतो- अजूनही त्या पवित्र वस्तूचा मान राखतात.
शास्त्रीजी म्हणतात- प्रतीक ही मौनाची भाषा आहे. शांतीचे संगीत आहे. संस्कृतीच्या महिम्याचे मूक गीत आहे. प्रतीकोपासना म्हणजे बिंदूमध्ये सिंधू पाहण्याची किंवा घागरीत सागर सामावण्याची शक्ती आहे. प्रतीक म्हणजे शब्दांच्या गैरहजेरीत विचार व्यक्त करण्याची व्यवस्था. प्रतीक म्हणजे संकेतात शास्त्रार्थ समजावण्याचे आगळे विज्ञान!’’
खरेच, महापुरुष कुठल्याही छोट्याशा वस्तूवर किती चिंतन करतात! आणि आपण? योगसाधक तरी करतील. (पू. पांडुरंगशास्त्री यांच्या प्रवचनांवर आधारित- संस्कृती पूजन)
फोटो – राष्ट्रध्वज, दगड व मूर्ती.